Pune rescue operation : मुसळधार पाऊस, दाट धुकं अन् भरकटलेला रस्ता…; भीमाशंकर अभयारण्यात अडकलेल्या ‘त्या’ तरुणांची अखेर सुटका
पोलीस आणि स्थानिक तरुणांनी अडकलेली दरीची जागा शोधून काढली आणि त्यांना दोरखंड तसेच इतर साहित्यांच्या आधारे सुरक्षित बाहेर काढले. मुसळधार पाऊस आणि दाट धुके असल्यामुळे मदत कार्य करण्यास अडचणीदेखील येत होत्या.
भीमाशंकर, पुणे : भीमाशंकर अभयारण्यामध्ये (Bhimashankar Sanctuary) अडकलेल्या 6 युवकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. उल्हासनगर येथील सहा युवक पुणे जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर याठिकाणी बैलघाटाने येत होते. मुसळधार पडणारा पाऊस आणि दाट धुक्यामुळे खोल दरीमध्ये सहा जण अडकले होते. सायंकाळी आपत्कालीन क्रमांकावर फोन आल्यानंतर घोडेगाव पोलिसांनी (Ghodegaon police) काही स्थानिक युवकांच्या मदतीने त्यांना दोरीच्या सह्याने तब्बल चार तासानंतर सुखरूप बाहेर काढले. भीमाशंकरला दर्शनासाठी अनेक युवक येत असतात. त्यातच कर्जतमार्गे गुगल मॅपवर भीमाशंकर हे जवळ दाखवत असल्याने अनेक युवक दर्शनासोबत पर्यटनदेखील (Tourism) करत असतात. अशावेळी दुर्घटना घडण्याचा धोकाही असतो. असाच हा प्रकार होता होता सुदैवाने राहिला आणि तरुणांची सुटका झाली.
कोकणातून येत पोहोचले भीमाशंकरला
अनेक वेळा अशा घटना घडल्या आहेत. अनेक पर्यटक कित्तेक तास मदतीच्या प्रतीक्षेत राहिले आहेत. कारण या भागात मोबाईल नेटवर्क कधी मिळते तर कधी नाही आणि त्यात जोरदार पाऊस, दाट धुके असल्याने या भागातून चालणेही मुश्किल असताना अनेक पर्यटक या मार्गाने येत असतात. यामध्ये पवन अरूण प्रताप सिंग (वय 26, रा. उल्हासनगर), सर्वेश श्रीनिवास जाधव (वय 26), नीरज रामराज जाधव (वय 28), दिनेश धर्मराज यादव (वय 23), हितेश श्रीनिवासी यादव (वय 25), अंकुश सत्यप्रकाश तिवारी (वय 23, सर्व रा. उल्हासनगर) या सहा युवकांनी कोकणामधून दुपारी चढायला सुरुवात केली.
पाच वाजताच पडला अंधार
रस्त्याने मुसळधार पाऊस आणि दाट धुके होते. या वातावरणात सायंकाळी पाच वाजता अंधार पडला. त्यामुळे त्यांना रस्ता दिसेनासा झाला. हे सहा जण घाबरले. पोलीस आणि स्थानिक तरुणांनी अडकलेली दरीची जागा शोधून काढली आणि त्यांना दोरखंड तसेच इतर साहित्यांच्या आधारे सुरक्षित बाहेर काढले. मुसळधार पाऊस आणि दाट धुके असल्यामुळे मदत कार्य करण्यास खूप अडचणीदेखील येत होत्या.
पोलिसांसह स्थानिक तरुणांकडून मदतकार्य
या मोहिमेमध्ये घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, पोलीस हवालदार गणेश गवारी, पोलीस नाईक तेजस इष्टे, नामदेव ढेंगळे, रोहिदास गवारी, स्वप्नील कानडे, माणिकराव मुळूक, जीवन गवारी, मनीषा तुरे, वृषाली भोर तसेच स्थानिक युवक सागर मोरमारे आणि सूरज बुरूड यांनी मदतकार्यात सहभाग घेतला.