Pune accident : डंपरचं चाक अंगावरून गेल्यानं महिलेचा जागीच मृत्यू, सिंहगड रस्त्यावरची दुर्दैवी घटना; चालक फरार
अपघात झाल्यानंतर या डंपरचा चालक फरार झाला आहे. वाहन सोडून त्याने पलायन केले. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर पुढील तपास सिंहगड रोड पोलिसांकडून केला जात आहे.
पुणे : अंगावरून डंपरचे चाक गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू (Dead) झाला आहे. सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे हा अपघात झाला आहे. दुचाकीवरून कामावर निघालेल्या महिलेवर काळाने झडप घातली आहे. वृषाली तुषार थिटे (वय 38, रा. सुदत्त संकुल, शिंदे मैदानाजवळ, वडगाव बुद्रुक) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी नऊच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी डंपर चालकाच्या विरोधात सिंहगड रोड पोलिसांत (Sinhagad road police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृषाली थिटे या नऱ्हे येथील झील कॉलेज याठिकाणी प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी त्या कामावर निघाल्या होत्या. वडगाव बुद्रुक (Vadgaon Budruk) जवळच्या कॅनॉल लगत असणाऱ्या शिंदे मैदानाजवळ आल्या असता वेगवान डंपरने त्यांना जोरदार धडक दिली.
रुग्णालयात दाखल केले, पण…
डंपरच्या धडकेने त्या खाली पडल्या आणि त्याचवेळी चाकाखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड, सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे तसेच कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघात झालेल्या महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्या मृत पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
‘बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी’
अपघात झाल्यानंतर या डंपरचा चालक फरार झाला आहे. वाहन सोडून त्याने पलायन केले. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर पुढील तपास सिंहगड रोड पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, सिंहगड रोड, धायरी या परिसरात टँकर त्याचप्रमाणे डंपरच्या फेऱ्या जास्त होण्याच्या दृष्टीने अनेक चालक बेदरकारपणे वाहने चालवतात. याठिकाणच्या नागरिकांनीदेखील वारंवार याविषयी तक्रारी केल्या आहेत. याठिकाणाहून वाहने चालवताना तसेच रस्त्यावरून चालतानादेखील भीती वाटत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. वाहतूक पोलिसांनी अशा बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.