पुणे : कोविडमुळे (Covid) मागील दोन वर्षांपासून बंद असलेली उन्हाळी शिबिरे, फेस्टिव्हल्स सुरू होत आहेत. मागील दोन वर्ष खेळणारी, बागडणारी मुले घरांत बंदिस्त होती. खेळणेच काय शाळादेखील घरातूनच सुरू होती. ऑनलाइन शिक्षणांमुळे मुलांमध्ये बंदिस्तपणाची भावना निर्माण झाली होती. आता अनेक निर्बंध शिथिल (Restrictions relaxed) करण्यात आले आहेत. मागील काही महिन्यांपासून शाळाही सुरू झाल्या. मास्कची सक्ती शिथिल करण्यात आली. अर्थात पुन्हा मास्कसक्ती होण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, आता उन्हाळा सुरू झाला आहे. कोविडच्या आधी जशी दर उन्हाळ्यात लहान मुलांसाठी विविध शिबिरे (Summer camps) घेतली जात होती, तशीच पुन्हा सुरू होणार आहेत. दरम्यान, बहुतेक शिबिरे मे अखेरपर्यंत सुरू राहतील. कारण यावर्षी मागणी खूप आहे, असे विविध ठिकाणच्या आयोजकांनी सांगितले आहे.
लहान मुलांसाठी उन्हाळी शिबिरे आयोजित करणार्या बहुतेक प्री-स्कूल आणि नर्सरी शाळांनी सांगितले, की नेहमीच्या दरापेक्षा किमान तिप्पट मागणी तर झाली आहेच, पण शिबिरांमधील उपक्रमांचे स्वरूपही बदलले आहे. उन्हाळी शिबिरे हे लहान मुलांसाठी शालेय जीवन कसे असू शकते, याची पहिली झलक असल्याने आयोजकांनी सांगितले, की साथीच्या रोगाने आणि त्यानंतरच्या विलगीकरण आदी बाबींमुळे लहान मुलांसमोर आणलेल्या नवीन आव्हानांवर मात करण्यासाठी उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे.
विविध ठिकाणच्या शिबिरे आयोजित करणाऱ्या संस्थांच्या मते, यंदा अतिरिक्त बॅचेस जाहीर कराव्या लागत आहेत. उन्हाळा त्रासदायक असला तरी मे महिन्यात अनेक पालक या शिबिरांसाठी आग्रही आहेत. मुलांसाठी अनुकूल अभ्यासक्रम आणि उपक्रमांमध्येही सुधारणा करावी लागत आहे.
पूर्वीच्या उन्हाळी शिबिरांमध्ये विविध खेळ, रेखाचित्रे, कथाकथनाची सत्रे असायची, ज्यात मुलांना एकाच ठिकाणी बसावे लागत होते. यावर्षी मात्र विविध खेळ, मैदानी खेळ, नृत्य आणि अशा शारीरिक हालचाली असलेले अनेक उपक्रम आहेत ज्यात त्यांना त्यांची ऊर्जा खर्च करण्याची आणि स्वतःला व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे.