Pune crime : शिवीगाळ केली म्हणून कोयत्यानं केले सपासप् वार; पुण्यातल्या लोणी काळभोरमधून तिघांना अटक
मंगेश शिंगाडे याच्याविरुद्ध 2016मध्ये खुनाचा गुन्हा दाखल असून तो कारागृहाबाहेर आला होता. काही दिवसांपूर्वी मंगेश आणि आरोपींमध्ये एकमेकांकडे पाहण्यावरून वाद झाला होता. त्याच वादातून मंगेशने त्यांना आई-बहिणीवरून शिवीगाळ केली होती.
पुणे : शिवीगाळ केल्यामुळे एकावर कोयत्याने वार (Attack) करून त्याचा खून करण्यात आला आहे. पुण्यात ही घटना घडली आहे. आई-बहिणीला शिवीगाळ केल्याच्या रागातून हे वार करण्यात आले. याप्रकरणी तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट पाचने (Crime Branch Unit Five) अटक केली आहे. संबंधित आरोपी कर्नाटक राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना लोणी काळभोर परिसरातील टोलनाक्यावर ताब्यात घेण्यात आले. ही घटना सोमवारी रात्री फुरसुंगीतील (Fursungi) भेकराई बसस्थानकाजवळ घडली होती. किरण विठ्ठल धोत्रे (वय 19), अजय सचिन माने (वय 20, दोघेही रा. भेकराईनगर), प्रशांत शंकर हिरेमठ (वय 19, रा. ढमाळवाडी, हडपसर, मूळ रा. कर्नाटक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर मंगेश किशोर शिंगाडे (वय 26, रा. पापडे वस्ती, भेकराईनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
एकमेकांकडे पाहण्यावरून वाद
मंगेश शिंगाडे याच्याविरुद्ध 2016मध्ये खुनाचा गुन्हा दाखल असून तो कारागृहाबाहेर आला होता. काही दिवसांपूर्वी मंगेश आणि आरोपींमध्ये एकमेकांकडे पाहण्यावरून वाद झाला होता. त्याच वादातून मंगेशने त्यांना आई-बहिणीवरून शिवीगाळ केली होती. त्यानंतर आरोपींच्या मनात मंगेशविषयी राग होता. त्याला एकटे गाठून जाब विचारण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. आरोपी संधीची वाटच पाहत होते. त्यानंतर आरोपींनी भेकराई बस स्थानकाशेजारी थांबलेल्या मंगेशला जाब विचारला तसेच कोयत्याने सपासप वार केले आणि त्याचा खून केला. त्यानंतर आरोपी तिथून पळून गेले. रक्ताच्या थारोळ्यात मंगेशचा मृतदेह बसस्थानकाशेजारच्या परिसरात पडून होता.
कर्नाटकमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होते आरोपी
तपासानुसार आरोपी लोणी काळभोर टोलनाक्यावर असून ते कर्नाटकमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस अंमलदार अकबर शेख आणि प्रमोद टिळेकर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्यांना जेरबंद केले. ही कामगिरी उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, अकबर शेख, प्रमोद टिळेकर, रमेश साबळे, दया शेगर, दाऊद सय्यद, दत्तात्रय ठोंबरे, संजयकुमार दळवी यांनी केली.