Pune Toll : पुणे-नाशिक महामार्गावरून प्रवास करताय? टोलसाठी खिसा करावा लागणार रिकामा, वाचा सविस्तर…
दोन महिन्यांनंतरच पुन्हा चाळकवाडी टोलनाक्यावरील टोल 25 रुपयांनी वाढविला आहे. त्यानुसार आता कार व हलक्या वाहनांना एकेरी प्रवासासाठी 75 आणि दुहेरी प्रवासासाठी 110 रुपये टोल आकारण्यात येणार आहेत.
पुणे : पुणे-नाशिक महामार्गावरून (Pune-Nashik highway) प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना आता मोठा भुर्दंड बसणार आहे. जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी येथील टोल नाक्यावर यावर्षी दुसऱ्यांदा टोल (Toll) वाढ करण्यात आली आहे. हलक्या वाहनांसाठी म्हणजेच कारसाठी तब्बल 25 रुपये वाढ करण्यात आली असून आजपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. चालूवर्षी एप्रिलमध्ये पाच रुपयांची वाढ करण्यात आली होती, तर आजपासून चाळकवाडी टोल 25 रुपयांनी वाढविण्यात आला आहे. यामुळे आता कार साठी एकेरी प्रवासासाठी 75 तर दुहेरी प्रवासासाठी 110 रुपये मोजावे लागणार आहेत. पुणे आणि नाशिक या दोन मोठ्या शहरांना जोडणारा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. मात्र या मार्गावर जुन्नर (Junnar) तालुक्यातील चाळकवाडी येथील टोलनाक्यावर एका वर्षात दोनदा टोल वाढ केली आहे.
टोलनाका मार्च महिन्यात पुन्हा सुरू
राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर दोन वर्षांनी टोलवाढ करण्यात येते. मात्र पुणे-नाशिक महामार्गावर वाढ केल्याने वाहन चालकांची खिशाला आता कात्री लागणार आहे. चाळकवाडी टोलनाका 2017मध्ये स्थानिक नागरिकांनी बंद पाडला होता. त्यासाठी आंदोलने ही करण्यात आली होती. आता हा टोलनाका मार्च महिन्यात पुन्हा सुरू करण्यात आला. त्यानंतर एप्रिल महिन्यात चाळकवाडी येथील टोलनाक्यांवर आकारण्यात येणाऱ्या टोलमध्ये 1 एप्रिल 2022 रोजी पाच रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानुसार कारला एकेरी प्रवासासाठी 50 रुपये आणि दुहेरी प्रवासासाठी 80 रुपये टोल आकारला जात होता.
वाहनचालकांना बसणार फटका
आता दोन महिन्यांनंतरच पुन्हा चाळकवाडी टोलनाक्यावरील टोल 25 रुपयांनी वाढविला आहे. त्यानुसार आता कार व हलक्या वाहनांना एकेरी प्रवासासाठी 75 आणि दुहेरी प्रवासासाठी 110 रुपये टोल आकारण्यात येणार आहेत. हलकी व्यावसायिक वाहने, मिनी बससाठी एकेरीचा टोल 115 रुपये करण्यात आला आहे. तर, ट्रक व बसचा एकेरी वाहतुकीचा टोल 270 राहणार आहे. यामुळे याचा फटका हा वाहनचालकांना बसणार आहे. पुणे जिल्ह्यात आधीच टोलवरून वादंग सुरू आहे. खेड-शिवापूर टोलचा मुद्दा आणि वाद असताना आता या टोलवरील दरवाढीमुळे वाहनचालकांना मात्र पुन्हा एकदा भुर्दंड सोसावा लागणार आहे. इंधन दरवाढीत आणखी एक दरवाढ वाहनचालकांच्या माथी मारण्यात आली आहे.