लोणावळ्याचा मोह आवरा, जीवापेक्षा पर्यटन महत्वाचे आहे का? मावळ-मुळशीला जाणाऱ्या पर्यटकांना प्रशासनाचे आवाहन

| Updated on: Jul 25, 2024 | 11:55 AM

Tourist Alert : पुणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. त्यामुळे याभागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर लोणावळा सह इतर अनेक पर्यटनस्थळी मुसळधार पावसाने कहर केला आहे. त्यामुळे प्रशासनाने मोठे पाऊल टाकले आहे.

लोणावळ्याचा मोह आवरा, जीवापेक्षा पर्यटन महत्वाचे आहे का? मावळ-मुळशीला जाणाऱ्या पर्यटकांना प्रशासनाचे आवाहन
लोणावळा, मावळ, मुळशीत पर्यटकांना बंदी
Follow us on

पुण्याला जोरदार पावसाने तडाखा दिला आहे. पावसाने रात्रभर पुणे आणि आसपासच्या परिसराला झोडपून काढले. त्यामुळे पुण्यातील काही भागातील रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. दरम्यान पुणे आणि आसपासच्या पर्यटनस्थळबाबत प्रशासनाने मोठे पाऊल टाकले आहे. जीवापेक्षा पर्यटन महत्वाचे नसल्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुसळधार पावसाचा धोका

हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येत्या चार दिवसांचा हवामानाचा अंदाज सांगत सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला आहे.

हे सुद्धा वाचा

पर्यटकांना केली बंदी

लोणावळा परिसरामध्ये मागील 48 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी साचले आहे. सहारा पुल, भुशी धरण, लाईन्स पॉईंट या परिसरामध्ये पावसाचा अक्षरशः कहर पाहिला मिळत आहे. सर्व धबधबे मोठ्या प्रमाणात प्रवाहित होऊन वाहत आहेत.

या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी व धोका निर्माण होऊ नये याकरिता सुरक्षेच्या कारणास्तव या सर्व परिसरामध्ये पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. लोणावळा धरणाच्या पायथ्याशी लोणावळा पोलिसांनी चेक पोस्ट लावत सर्व पर्यटक वाहने व इतर सर्व प्रकारच्या वाहनांना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

चार दिवस बंदी

मावळ प्रांत अधिकाऱ्यांनी 25 जुलै ते 29 जुलै दरम्यान मावळ व मुळशी तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळे सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्याबाबत आदेश दिले आहेत. दरम्यान लवासा सिटी परिसरात अनेक ठिकाणी दरड कोसळल्याचे समोर येत आहे. त्यात तीन बंगले गाडल्या गेले आहे. त्यातील कामगारांचा शोध घेण्यात येत असल्याचे समोर येत आहे.

लोणावळ्यात उच्चांकी पाऊस

पर्यटन नगरी लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. या पावसाने यंदाच्या मोसमातील उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात तब्बल 370 मिलिमीटर पाऊस बरसला आहे.यामुळे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचं बोललं जातं आहे. या 1 जून पासून 2971 मिलीमीटर इतका पाऊस बरसला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 2638 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.