पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांची बदली? कृष्णप्रकाश यांच्याजागी विश्वास नांगरे पाटील येणार?
आयर्नमॅन म्हणून ओळख असलेले पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त (Commissioner of Police) कृष्ण प्रकाश (Krishnaprakash) यांची बदली झाल्याची चर्चा सध्या पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात रंगू लागली आहे.
पिंपरी चिंचवड : आयर्नमॅन म्हणून ओळख असलेले पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त (Commissioner of Police) कृष्ण प्रकाश (Krishnaprakash) यांची बदली झाल्याची चर्चा सध्या पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात रंगू लागली आहे. कृष्णप्रकाश यांची बदली होऊन त्यांच्याजागी मुंबई पोलीस दलातील विश्वास नांगरे पाटील यांची पोलीस आयुक्तपदी निवड होण्याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे. यामुळे येथील पोलीस कर्मचारी, अधिकारी आनंदी असल्याचे समजत आहे. दुसरीकडे हा सर्व प्रकार ‘फूल’ बनविण्याचा असल्याचे आता समोर आले आहे. ‘एप्रिल फूल’मुळे अनेकांची पंचाईत झाली. त्यांच्या बदलीने खूश असणाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. आज एप्रिल महिन्याचा पहिला दिवस आहे. त्यातच पोलीस आयुक्त असलेले कृष्णप्रकाश यांची तडकाफडती बदली झाली आहे, असे मेसेजेस सकाळपासून विविध व्हाट्सअॅप ग्रुपवर फिरत आहेत.
विविध विभागांत चर्चेला पेव
मेसेज पाठवणारे, व्हायरल करणारे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर मुंबई पोलीस दलातील विश्वास नांगरे पाटील यांची कृष्ण प्रकाश यांच्या जागेवर नियुक्ती झाल्याचेही त्यात म्हटले आहे. त्यामुळे पोलीस दलातील विविध विभागांत चर्चेला पेव फुटले. अनेकांना त्यांच्या बदलीची वाट आहे. अधिकारी-कर्मचारी यांच्यामध्ये फोन कॉल्सची धावपळ सकाळपासून पाहायला मिळत होती.
1998च्या बॅचचे आयपीएस अधिकारी
कृष्णप्रकाश त्यांच्या धडक कारवायांमुळे ओळखले जातात. त्यांची एक शिस्त आहे. पदभार स्वीकारल्यापासून ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. दोन सप्टेंबर 2020मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृष्णप्रकाश हे 1998च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात महत्त्वाची पदे सांभाळली आहेत. तर पिंपरी चिंचवडमध्ये नुकतेच त्यांनी वेषांतर करून एका खंडणीखोराच्या मुसक्या आवळल्या होत्या.