Pune fire incident : ट्रकनं पेट घेतल्यानं चारा जळून खाक; पुण्याच्या वेल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं 50 हजारांचं नुकसान
वेल्हा तालुक्यातील शेतकरी बापू झाणजे, भानुदास शेंडकर, अनंता कोडीतकर आणि अमित जाधव या चार शेतकऱ्यांनी मिळून हा चारा विकत घेतला होता. तालुक्यातील मार्गासनी रस्त्यावर साखर फाट्याजवळ चाऱ्याचा ट्रक आला. त्यानंतर ट्रक ओव्हरलोड असल्याने विजेच्या तारांचा स्पर्श झाला आणि चाऱ्याने पेट घेतला.
वेल्हा, पुणे : जनावरांच्या चाऱ्याने भरलेल्या ट्रकने पेट घेतल्याने संपूर्ण चारा जळून खाक (Burnt) झाला आहे. पुण्यातील वेल्हा तालुक्यात ही आगीची घटना घडली आहे. जनावरांच्या चाऱ्याने भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचे घर्षण झाल्याने ट्रकमधील चाऱ्याने पेट घेतला. मात्र त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या महावितरणच्या (Mahavitaran) कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत चारा लाकडाच्या साहाय्याने रस्त्यावर काढला. त्यामुळे ट्रक वाचविण्यात त्यांना यश आले, मात्र यात जनावरांचा चारा जळून खाक झाला आहे. चार शेतकऱ्यांचा हा चारा (Fodder) होता. या चाऱ्याने वाहन भरले होते. त्यामुळे अतिरिक्त वजन असलेल्या या वाहनाचा विजेच्या तारांना स्पर्श झाला आणि त्यातच ही आग लागली. चारा असल्यामुळे लवकर आग पसरली. चाऱ्याने पेट घेतल्याने वेल्हा-नसरापूर मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.
शेतकऱ्यांचे 50 हजारांचे नुकसान
वेल्हा तालुक्यातील शेतकरी बापू झाणजे, भानुदास शेंडकर, अनंता कोडीतकर आणि अमित जाधव या चार शेतकऱ्यांनी मिळून हा चारा विकत घेतला होता. तालुक्यातील मार्गासनी रस्त्यावर साखर फाट्याजवळ चाऱ्याचा ट्रक आला. त्यानंतर ट्रक ओव्हरलोड असल्याने विजेच्या तारांचा स्पर्श झाला आणि चाऱ्याने पेट घेतला. शेजारी हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी बसलेले महावितरणाचे कर्मचारी तन्वीर शेख, हेमंत कुंभार, प्रकाश पिलाने यांनी प्रसंगावधान दाखवत ट्रक थांबविला आणि स्थानिक लोकांच्या मदतीने ट्रकमधील चारा लाकडाच्या साह्याने रस्त्यावर काढला. त्यामुळं ट्रक आगीपासून वाचला, मात्र यामध्ये चारा जळून खाक झाला. या आगीत शेतकऱ्यांचे 50 हजारांचे नुकसान झाले आहे.
जड वाहतुकीचा फटका
अनेकवेळा शेतकरी आपल्या वाहनातून शेतीचे साहित्य नेत असतात. त्यावेळी ओव्हरलोड होतो. वाहनातील साहित्य चारा, कापूस, लाकूड अशा स्वरुपाचे असेल तर त्यांना आग लवकर लागते. महावितरणच्या अनेक ठिकाणच्या रस्त्यावरील तारा कमी उंचीवर आहेत. त्यामुळे जड वाहनांना मोठी कसरत करावी लागते. या तारांना वाहनाचे घर्षण झाल्यानंतर आगीच्या घटना घडतात. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.