Pune crime : भाजपा नेत्याच्या फार्म हाऊसवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तृप्ती देसाई आक्रमक
पुण्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुण्यातील एका भाजपा नेत्याच्या शेती आणि फार्महाऊसवर विशाल गायकवाड आणि पीडित मुलगी यांचे आई-वडील वास्तव्य आणि कामासाठी आहेत.
शिरूर, पुणे : अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार (Physical abuse) करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या (Shikrapur police station) हद्दीत भाजपा नेत्याच्या शेती आणि फार्महाऊसवर कामाला असणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलीसोबत हा प्रकार घडला आहे. तिच्याच नात्यातील तरुणाने तिला जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला आहे. विशाल गायकवाड असे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. शिक्रापूर पोलिसांनी या नराधमास अटक केली आहे. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील भाजपाच्या एका नेत्याच्या मालकीच्या शेती आणि फार्महाऊसवर घडला आहे. दरम्यान, पीडितेला न्याय मिळवून देत असताना दबाव येणार असल्याचा गंभीर आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी केला आहे.
पीडिता आणि आरोपी नातेवाईक
पुण्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुण्यातील एका भाजपा नेत्याच्या शेती आणि फार्महाऊसवर विशाल गायकवाड आणि पीडित मुलगी यांचे आई-वडील वास्तव्य आणि कामासाठी आहेत. पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपी हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत. पीडित मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर त्यांच्याच नात्यातील या नराधमाने या फार्म हाऊसच्या मागच्या मजूर खोल्यांच्या मागे या अल्पवयीन मुलीला नेले. तेथे गेल्यानंतर जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. याता याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे.
‘…तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल’
हा फार्महाऊस भाजपाच्या नेत्याचा असल्यामुळे त्याची चर्चा कुठे होऊ नये, या फार्म हाऊसची चर्चा कुठे होऊ नये, यासाठी दबाव आणला जाऊ शकतो, अशी स्थानिकांनी शक्यता व्यक्त केली आहे, अशी माहिती तृप्ती देसाई यांनी दिली आहे. अशा अनेक तक्रारी आणि फोन मला आले आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे, की या बारा वर्षीय मुलीला न्याय मिळावा यासाठी हे प्रकरण तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवले जावे तसेच संबंधित भाजपा नेत्याचा घटनेशी संबंध नसला तरी फार्म हाऊस त्यांच्या मालकीचे आहे. त्यामुळे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा देसाई यांनी दिला आहे.