टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : पुण्यात आणखी एक तरूणी दर्शना पवार होता होता वाचली, अंगावर काटा आणणारी घटना
पुण्याच्या रस्त्यावर, वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार होत असताना पोलीस मात्र गायब होते असा आरोप स्थानिकांनी केलाय. हल्ला झालेल्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर पेरुगेट पोलीस चौकी आहे. पण पोलिसांना घटनास्थळावर पोहोचायला तब्बल 15 मिनिटे का लागली असा सवाल स्थानिकांनी केलाय
पुणे : आताच एमपीएससी पास दर्शना पवार प्रकरणामुळे पुणे हादरून गेलं होतं. ही घटना ताजी असताना परत एकदा पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात भर रस्त्यात तरुणीवर कोयत्यानं वार करण्यात आले आहेत. भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर हा प्रकार घडल्यानं विरोधकांनी राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरुन सरकारला धारेवर धरलंय.
सदाशिव पेठेमधून सकाळी 10 वाजता एक युवती आपल्या मित्रासोबत कॉलेजला जात होती. पण शंतनू जाधव नावाच्या आरोपीनं त्या दोघांना अडवलं. आरोपीनं तरुणीशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तरुणीच्या मित्रानं त्याला हटकलं. त्यानंतर आरोपी काही पावलं मागे गेला. तरुणीच्या मित्रानं गाडीवरुन उतरत आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण शंतनू जाधवनं जवळ असलेल्या बॅगमधून कोयता बाहेर काढला आणि पहिला वार तरुणीच्या मित्रावर केला.
पाहा व्हिडीओ-
अचानक झालेल्या हल्ल्यामुळं तरुणीचा मित्र घाबरला आणि पळून गेला. आरोपीनं मग तरुणीचा पाठलाग सुरु केला. घाबरलेली तरुणी रस्त्यात खाली कोसळली आणि आरोपीनं तिच्यावर वार करायला सुरुवात केली. सकाळी 10 ची वेळ असल्यानं रस्त्यावर वर्दळ होतीच. सदाशिव पेठेत एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थीही होते. आरोपी वार करत असताना एमपीएससीचा अभ्यास करणाऱा एक तरुण मदतीला धावला.
लेशपाल जवळगे नावाच्या मुलानं आरोपीच्या हातातून कोयता हिसकावण्याचा प्रयत्न केला. यात लेशपालच्या हाताला दुखापतही झाली.. त्यानंतर इतरही काहीजण त्याच्या मदतीला धावले. आरोपी आणि हल्ला झालेल्या तरुणीची जुनी मैत्री होती. काही वर्षांपूर्वी ते एकत्रच शिकत असल्याची माहिती आहे. दोघांमध्ये काही कारणांवरुन वाद झाला होता. तेव्हापासून त्या तरुणीनं आरोपीशी बोलणं सोडून दिलं होतं..
पुण्याच्या रस्त्यावर, वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार होत असताना पोलीस मात्र गायब होते असा आरोप स्थानिकांनी केलाय. हल्ला झालेल्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर पेरुगेट पोलीस चौकी आहे. पण पोलिसांना घटनास्थळावर पोहोचायला तब्बल 15 मिनिटे का लागली असा सवाल स्थानिकांनी केलाय.
काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या एमपीएससीच्या विद्यार्थिनीची तिच्याच मित्रानं निर्घृण हत्या केली होती. लग्नाला नकार दिल्याचा कारणातून दर्शना पवारला तिच्याच मित्रानं संपवलं होतं. पुण्यात त्याचीच पुनरावृत्ती होता होता टळली.