भय इथले संपत नाही, पुण्याच्या नवले पुलावर अपघातांची मालिका, दिवसभरात दोन जीवघेणे अपघात
नवले पुलावर आज दुपारी भरधाव कंटेनर दुभाजकाला धडकल्याने पहिला अपघात झाला. त्यानंतर लगेच तासाभरात दुसरा अपघात झाला.

पुणे : पुण्यातील नवले पुलावर दोन दिवसांपूर्वी 48 वाहनांच्या भीषण अपघाताची बातमी ताजी असताना आज पुन्हा नवले पुलावर एका पाठोपाठ तासाभराच्या फरकाने दोन अपघात झाले. नवले पुलावरील अपघातांच्या या मालिकेमुळे प्रशासनासह पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. नवले पुलावर आज दुपारी भरधाव कंटेनर दुभाजकाला धडकल्याने पहिला अपघात झाला. या अपघातात दोन कारचे नुकसान झाले.
साताऱ्याहून मुंबईच्या दिशेल्या जाणाऱ्या कंटेनरने दुभाजकाला धडक दिल्याने पहिला अपघात झाला. तोल सुटल्याने हा कंटेनर दुसऱ्या बाजूला आला. त्यामुळे संबंधित घटना घडली. पण सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण दोन गाड्यांचं मोठं नुकसान झालं.
विशेष म्हणजे पहिल्या अपघाताची बातमी ताजी असताना लगेच तासाभरात दुसरा अपघात झाला. भरधाव कंटेनरने तीन गाड्यांना धडक दिली. त्यामुळे संबंधित अपघाताची घटना घडली. या अपघातात सुदैवाने कुणीही जखमी झालं नाही.
दरम्यान, नवले पुलाजवळ रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने संबंधित परिसरातील अतिक्रमणावर कारवाईला सुरुवात केल्याची बातमी समोर आली होती. मंगळवारी सकाळी पोलिसांच्या बंदोबस्तात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली.
नवले पुलावरील 48 वाहनांच्या अपघाताच्या घटनेची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेत तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार पोलीस, महापालिका, रस्ते विकास महामंडळ यांच्या पथकाने सोमवारी घटनास्थळाची पाहणी करून तात्काळ उपाययोजना करण्याच्या सुचविल्या होत्या.
48 वाहनांना धडक देणाऱ्या चालकाला बेड्या
दरम्यान, नवले पुलावर 48 वाहनांना धडक देणाऱ्या कंटेनरच्या चालकाला पोलिसांनी अटक केलीय. नवले पूल येथे अपघातात फरार झालेला चालकाला सिंहगड पोलिसांकडून अटक करण्यात आलीय. मनिराम यादव असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. त्याला चाकण येथील नानेकरवाडी येथून ताब्यात घेतले. रविवारी या चालकाने गाडी उतारावर न्यूट्रल ठेवून चालवली असताना त्याला गाडीचे ब्रेक लागला नाही. त्यामुळे त्याने जवळपास 48 वाहनांना धडक दिली होती. यात सुमारे 40 ते 50 जण जखमी झाले आहेत. या ट्रक चालकाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
वेगमर्यादा 40 वर करा, सुप्रिया सुळेंची मागणी
दरम्यान, कात्रज ते नवले पूल तीव्र उताराच्या भागात वेगमर्यादा 40 वर करा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. या मार्गावर सातत्याने अपघात होतायेत हा भाग अपघाताचा हॉटस्पॉट बनतोय. या भागात लवकरात लवकर उपाययोजना करा. जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक लवकरात लवकर आयोजित करा, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे पत्र लिहून केली.