लोणी काळभोर, पुणे : लोणी रेल्वे स्टेशन येथे रेल्वेच्या अपघातात (Railway accident) दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. चंद्रकांत शनीचर चव्हाण (अंदाजे वय 50, राहिंज वस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) आणि राम पुकार (वय 22, रा. उत्तर प्रदेश) अशी मृत्यूमुखी (Dead) पडलेल्या दोघांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत चव्हाण हे लोणी काळभोर (Loni Kalbhor) परिसरात भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत होते. बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास चव्हाण हे लोणी स्टेशन येथील रेल्वे लाइन ओलांडताना सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या हैदराबाद एक्स्प्रेसने धडक दिली. यामध्ये चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दुसरी घटना रेल्वेतून खाली पडून मृत्यू झाल्याची घडली आहे.
दौंडकडून पुण्याच्या दिशेने चाललेल्या जेसीडी एक्स्प्रेसमधून परप्रांतीय मजूर राम पुकार दरवाजात बसून चालला होता. पुकार हा सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास लोणी स्टेशन येथे जेसीडी गाडीतून खाली पडला. दरवाज्यात उभे असताना त्याचा पाय घसरला आणि तो थेट रेल्वेच्या खाली पडला. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
रेल्वे रुळावरून कोणीही चालू नये, रेल्वे रूळ ओलांडू नये. प्रवाशांनी पुलाचा वापर करावा, अशा सूचना रेल्वेकडून प्रवाशांना देण्यात येतात. मात्र प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे दुर्घटना होतात. पोलिसांनी याविषयी प्रवाशांना आवाहन केले आहे, की रेल्वे रूळ कोणीही ओलांडू नये, रेल्वेने प्रवास करताना दरवाज्यात उभे राहू नये, रेल्वेमधून शरीराचा कोणताही भाग विशेषत: डोके दरवाज्याबाहेर काढू नये त्यामुळे गंभीर जखमी होऊन मृत्यूची संभावना वाढते. त्याचबरोबर रेल्वे येत असताना फलाटाजवळ थांबू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.