Uday Samant : त्यांच्यासोबत जे आहेत ते जोडण्यापेक्षा तोडण्याचं काम करतायत, उदय सामंतांची काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका
माझ्या मतदारसंघात मला काल अडीच हजार लोक भेटले. 17 नगरसेवक माझ्यासोबत आहेत. पाच जिल्हा परिषद सदस्य माझ्यासोबत आहेत. आणखी 7 जिल्हा परिषदा फिरणार आहे. मग ठरवा कोण कोणासोबत आहे, असा सवाल उदय सामंत यांनी केला.
पुणे : औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव देण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) घेतला. तत्कालीन सरकारने घेतलेल्या निर्णयात कायदेशीर अडचणी होत्या. आज तो निर्णय झाला आहे. शिवसेना नेतृत्व कमी पडले नाही. जे त्यांच्याबरोबर आहेत, ते जोडण्यापेक्षा तोडण्याचे काम करत आहेत, अशी टीका शिवसेनेचे बंडखोर नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. आम्ही गद्दार नसल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, की आम्ही उठाव केला. ही एक मोहीम आहे. आमच्यावर खालच्या स्तरात बोलण्यात आले. डुक्कर, गद्दार, बाटगे… नाही त्या शब्दांत बोलले. मात्र ठीक आहे. जनता याला विटली आहे, असे ते म्हणाले. तर शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आहेत. सेनाप्रमुख किंवा पक्षप्रमुख होण्याचा शिंदेंचा प्रयत्न नाही, असा दावाही त्यांनी केला.
‘जी जबाबदारी देतील ती मी पार पाडेन’
माझ्या मतदारसंघात मला काल अडीच हजार लोक भेटले. 17 नगरसेवक माझ्यासोबत आहेत. पाच जिल्हा परिषद सदस्य माझ्यासोबत आहेत. आणखी 7 जिल्हा परिषदा फिरणार आहे. मग ठरवा कोण कोणासोबत आहे, असा सवाल त्यांनी केला. आम्हाला आता काम करायचे आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस जी जबाबदारी देतील ती मी पार पाडेन, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी जे निर्णय घेतले, त्यांचा सन्मान करण्याचे ठरवले आहे. पुणेकरांकडून त्यांचा सन्मान होणार आहे. 2 हजार शिवसैनिक मुंबईला जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
‘पक्षप्रमुख होण्याचा शिंदेंचा प्रयत्न नाही’
शेतकऱ्यांच्या शासकीय अनुदानाचा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोल-डिझेल दर कमी करण्यात आले आहेत. आज नामांतराचा निर्णय घेतला, अशी माहिती त्यांनी दिली. 18 तारखेला मुंबईत शासकीय निवासस्थानी त्यांचा सत्कार होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका घेतली ती भूमिका बहुसंख्य पदाधिकाऱ्यांची आहे. त्याचे समर्थन होताना पाहायला मिळत आहे. 18 तारखेला स्पष्ट होईल, की आम्ही शिवसेनेचे आहोत.
‘शिंदेंचे समर्थन केले याचा अभिमान’
एकनाथ शिंदेंनी कुठेही म्हटले नाही, की शिवसेना घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. उद्धव साहेबांचा आमच्या मनातला आदर आहे, तो कायम राहणार. शिवसैनिकाला जसे दुःख झाले तसे मलाही झाले. उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. तर शाखाप्रमुख म्हणून शिंदेंनी काम केले. त्यांनी आता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांचे आम्ही समर्थन केले याचा आम्हाला अभिमान आहे, असे उदय सामंत म्हणाले.