Uday Samant : …तर असा हस्तक्षेप करतच राहणार, उदय सामंतांचा नितीन कळमकरांना टोला; पुणे विद्यापीठात हस्तक्षेप वाढल्याचं केलं होतं वक्तव्य
मी कॅम्पसमध्ये आलो म्हणजे इथला सातबारा माझ्या नावावर होणार नाही. कोणाच्या मनात गैरसमज असतील मी हस्तक्षेप करायला विद्यापीठात जातो, तर ते तसे नाही, गैरसमज दूर करावा, असे आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
पुणे : पैसे कमावण्यासाठी जर कोणी रानडे इन्स्टिट्यूट विकायला निघाले असेल, विद्यापीठात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांकडून जर कोणी प्रवेशाला हजार रुपये घेणार असेल तर उदय सामंत (Uday Samant) हस्तक्षेप करत राहील, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत. ते पुण्यात बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) हस्तक्षेप वाढल्याचे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन कळमकर यांचे मत होते. त्याचा समाचार उदय सामंत यांनी घेतला आणि नितीन कळमकर (Nitin Kalamkar) यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की जर विद्यार्थी हिताचे, पुणेकरांच्या हिताचे निर्णय मी घेतले आणि त्यात कोणाला हस्तक्षेप वाटत असेल तर मी असा हस्तक्षेप करत राहील, असे खडे बोल त्यांनी सुनावले आहेत. त्यामुळे आता माजी कुलगुरू नितीन कळमकर आणि मंत्री उदय सामंत आमनेसामने आले आहेत.
‘मलाही कळते कोणाला कसे एक्स्पोज करायचे’
उदय सामंत म्हणाले, की मी विद्यापीठाच्या कल्याणासाठी विद्यापीठात जात असतो. त्यामुळे आधी आठ दिवस सांगत नाही. काहींना हेदेखील आवडत नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू म्हणाले होते, की उदय सामंतांचा विद्यापीठात हस्तक्षेप वाढला आहे. पण मी का विद्यापीठात हस्तक्षेप केला, मी ही 28व्या वर्षी आमदार झालो, मलाही कळते कोणाला कसे एक्स्पोज करायचे, अशी नाव न घेता उदय सामंत यांनी माजी कुलगुरू डॉ. नितीन कळमकर यांच्यावर टीका केली आहे.
‘सातबारा माझ्या नावावर होणार नाही’
पुढे ते म्हणाले, की काही लोकांना वाटते मी हस्तक्षेप करतो. पण तो हस्तक्षेप नसतो, तर ती तुम्हाला केलेली मदत असते. मी कॅम्पसमध्ये आलो म्हणजे इथला सातबारा माझ्या नावावर होणार नाही. कोणाच्या मनात गैरसमज असतील मी हस्तक्षेप करायला विद्यापीठात जातो, तर ते तसे नाही, गैरसमज दूर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, एकमेकांवरील टीकेमुळे हा सामना यापुढे सुरूच राहील, अशीच शक्यता आहे.