Uday Samant : संजय राऊत म्हणाले तीच सर्व शिवसैनिकांची भावना; सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या वक्तव्यावर उदय सामंतांची सावध प्रतिक्रिया
प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. तर कोण बोलले, कोण नाही यावर बोलण्यापेक्षा संजय राऊत यांनी जी भूमिका स्पष्ट केली आहे, ती आमच्या सगळ्यांची भूमिका आहे, असे स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिले.
पुणे : सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पंढरपूरला जे साकडे घातले किंवा त्यावर संजय राऊत जे बोलले यावर एक शिवसैनिक म्हणून बोलणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते. महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार, तसेच राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रिमंडळासह तुळजाभवानीच्या दर्शनाला येईल, असे वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल केले होते. त्यावर उदय सामंत यांना विचारले असता त्यांनी अधिक काही भाष्य न करता बोलणे टाळले. तसेच 25 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहावा, ही एक शिवसैनिक म्हणून माझी इच्छा आहे, असेही ते यावेळी म्हणाले. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्याला आपले समर्थन असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्ष वाढवण्याचा सर्वांना अधिकार
राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेस हे तीन पक्ष सत्तेत आहेत. विचारधारा भिन्न असल्याने काहीतरी कुरबुरी समोर येत असतात. आता मुख्यमंत्रीपदावरून चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेच्या जागा अधिक असल्याने सध्या मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. मात्र इतर दोन पक्षांनाही आपला मुख्यमंत्री असावा असे वाटते. यावर सामंत म्हणाले, की सगळ्या पक्षांच्या नेत्यांकडून मी असे ऐकले आहे, की प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. तर कोण बोलले, कोण नाही यावर बोलण्यापेक्षा संजय राऊत यांनी जी भूमिका स्पष्ट केली आहे, ती आमच्या सगळ्यांची भूमिका आहे, असे स्पष्टीकरणही सामंत यांनी दिले.
काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?
राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे, सगळा पक्ष घेऊन दर्शनाला येईन, असs सुप्रिया सुळे यांनी काल म्हटले होते. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी बसण्याचा मान राष्ट्रवादीला मिळालेला नाही. मला मुख्यमंत्री कधी करायचे हे राज्यातील जनता ठरवेल, असे विधान सुप्रिया सुळे केले होते. ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी सुप्रिया सुळे यांनी तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना केली. सुप्रिया सुळे तुळजापूर दौऱ्यावर असताना त्यांनी भवानी मातेचे दर्शन घेतले. तेव्हा माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली होती.
संजय राऊतांची काय भावना?
सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे हे पुढील 25 वर्ष मुख्यमंत्री राहतील, हेच सुप्रिया सुळे यांचेही म्हणणे आहे, असे सांगतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात काही लोक संभ्रम निर्माण करत असतात. त्याकडे दुर्लक्ष करा. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. या आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे उद्धव ठाकरेंवर खूश आहेत. त्यामुळे ज्या लोकांनी प्रश्न निर्माण केला त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले.