Uddhav Thackeray : शाखा शाखांमधील बोर्डावरून धनुष्यबाण हटवा; उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आदेश
Uddhav Thackeray on Mashal : उद्धव ठाकरे यांच्या पुण्यातील एका घोषणेने राज्यातील गावा-गावात आता वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. मुंबईतही राडा पाहायला मिळू शकतो. शाखा शाखांमधील बोर्डावरून धनुष्यबाण हटवा, असा आदेश त्यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी पुण्यात पक्षाच्या मेळाव्यात आज जोरदार भाषण केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्यातील भाजपचे नेते आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या आक्रमक भाषणाने विधानसभेचे जणू रणशिंग फुंकल्या गेले. त्यांच्या या भाषणातील एका आदेशाने आता राज्यातील गावा-गावात विशेषतः मुंबईत मोठा राडा होण्याची शक्यता आहे. शाखा शाखांमधील बोर्डावरून धनुष्यबाण हटवा, असा आदेश त्यांनी दिला आहे.
सत्ताधाऱ्यांवर जोरदार प्रहार
भाषणात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नरेंद्र मोदी, भाजप नेत्यांवर निशाणा साधला. त्यांच्याकडून आपल्याला हिंदुत्व शिकण्याची गरज नसल्याचा हल्लाबोल केला. त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी धोरणावर जहाल भाषेत हल्लाबोल केला. भाजपकडे वाघ नाही, त्यांनी निवडणूक कधीही घ्या. पावसाचं थैमान झाल्यावर आता भगव्याचं थैमान होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफचा केक खाणाऱ्या औलादीकडून हिंदुत्व शिकायचं का? असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर घातला.
धनुष्यबाण नको तर हवी मशाल
पुण्यातील भाषणाच्या अखेरीस त्यांनी शिवसैनिकांना एक आदेश दिला. शाखा-शाखांतील बोर्डावर जी धनुष्य-बाणाची निशाणी आहे, ती हटवा आणि त्याठिकाणी मशाल चिन्ह लावा, असा आदेश त्यांनी पदाधिकारी, शिवसैनिकांना दिला. त्यांच्या या आदेशामुळे ज्या ठिकाणी शाखेवरुन वाद सुरु आहे अथवा ज्या ठिकाणी दोन्ही गट मजबूत आहे, तिथे वाद होण्याची शक्यता आहे. यापूर्वी पण शाखांवरुन दोन्ही गटातील पदाधिकारी भिडल्याचे राज्याने पाहिले आहे. खास करुन ठाणे, मुंबईत हा प्रकार घडला होता.
विधानसभेत शिवसेनेतील हे दोन्ही गट आमने-सामने असतील. अनेक मतदारसंघात आता दोन्ही गटांचे उमेदवार शेरास सव्वा शेर ठरण्याचा प्रयत्न करतील. लोकसभेनंतर महाविकास आघाडीचा उत्साह दुणावला आहे. तर महायुती लोकसभेचा वचपा काढण्याच्या तयारीत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून जहाल भाषेचा सुरु असलेला वापर हे त्याचे द्योतक आहे.