जयवंत शिरतर, जुन्नर : गेल्या तीन-चार दिवसांपासून जुन्नर (Junnar) तालुक्यातील पश्चिम भागांमध्ये वणवा लागण्याच्या घटना सुरू आहेत. आज पुन्हा राजूर नं.2 येथे अज्ञातांनी आग (Fire) लावल्याचा प्रकार घडला आहे. वन कर्मचाऱ्यांनी (Forest Department) ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांना खडतर परिश्रमानंतर यश आले. याआधी खडकुंबे, फांगुळगव्हाण, राळेगण, खटकाळे, उंडेखडक, तेजूर, चावंड, बोतार्डे, सोनावळे, बेलसर, बुचकेवाडी, पारुंडे आदी परिसरातील डोंगरावर समाजकंटकांकडून आगी लावण्यात आल्या आहेत. त्यानंतर आज पुन्हा हा प्रकार घडला आहे. ही आग विझवताना वनकर्मचाऱ्यांना अनेक अडचणी आल्या. काही चुकीच्या समजुतीतून हा प्रकार होत असल्याचे लक्षात आले आहे. मात्र यामुळे वनसंपदेचे अतोनात नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्या प्रबोधनाची आवश्यकता निर्माण झाली आहे.
या आगी लावण्यामध्ये विविध भ्रामक कल्पना, चुकीच्या समजुती आहेत. डोंगरावरील गवत पेटवल्यास येणारे गवत चांगले येते. आगीत जळालेल्या झाडांच्या फांद्या सोयीस्कररित्या काढता येणे आदी चुकीच्या समजुतीतून आगी लावल्यामुळे हजारो एकरवरील वनसंपदा नष्ट होत आहे. तसेच तेथील अमूल्य वन्यजीवांची हानी होत आहे.
#Pune : जुन्नर तालुक्यात वणव्याच्या घटना सुरूच… राजूर नं.2 येथे अज्ञातांनी लावलेली आग विझवताना वन कर्मचाऱ्यांची दमछाक…#FIRE #forest #Video
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmH04UAs pic.twitter.com/uYpVBMMOZg— TV9 Marathi (@TV9Marathi) April 6, 2022
जुन्नर तालुक्यात मानवनिर्मित वनव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जाणीवपूर्वक आगी लावण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात जैवविविधतेची हानी होत आहे. लोकांमध्ये आगी लावण्याबाबत भ्रामक समजुती आहेत. त्या समजूती घालविण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे, असे पर्यावरण अभ्यासक नवनाथ मोरे म्हणाले.