Covid vaccination : कोरोनाच्या रुग्णवाढीनंतर आता लसीकरणालाही आला वेग, बुस्टर डोस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी
राज्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र ही लाट सौम्य असेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. सर्दी, खोकला, ताप या आजाराचे रुग्ण मागील एक-दोन महिन्यात खूप कमी झाले होते. मात्र आता त्यात वाढ झाली आहे.
पुणे : कोविडचा (Covid) प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोविड रुग्णांमध्ये झपाट्याने होत असलेली वाढ आणि संभाव्य चौथ्या लाटेची चिंता यामुळे राज्यात दैनंदिन लसीकरणाचे (Vaccination) प्रमाण एक लाखाच्या वर गेले आहे. मे महिन्यात महाराष्ट्रात दररोज सरासरी 60,855 लसीकरणाची नोंद होत होती. 1-5 जून दरम्यान ही सरासरी वाढून जवळपास 80,200 झाली आहे आणि गेल्या दोन दिवसांत, लसीकरणाच्या ठिकाणी एक लाखाहून अधिक लोक लस घेण्यासाठी आले. राज्य लसीकरण अधिकाऱ्यांच्या मते, मागील काही दिवसांपासून सातत्याने होत असलेली कोरोनाची रुग्णवाढ यामुळे नागरिकांनी दुसरा डोस तसेच ज्यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत, त्यांनी बुस्टर डोस (Booster dose) घेण्यासाठी प्राधान्य दिल्याचे सांगितले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दैनंदिन लसीकरणात वाढ नोंदवली गेली आहे.
नागरिकांना समजू लागले लशीचे फायदे
कोरोनाचा प्रसार काही अंशी कमी झाला होता, मात्र त्याने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे नागरिकदेखील जागरूक झालेले पाहायला मिळत आहेत. नागरिकांना आता लशीचे फायदे समजू लागले आहेत. शाळाही लवकरच सुरू होणार आहेत. त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांचे लसीकरण करून घेत आहेत. राज्याच्या राजधानी मुंबईत त्याचप्रमाणे पुण्यात कोविडचे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनही सतर्क झाले आहे. दोन डोस घेतलेल्यांनी बुस्टर डोस घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
काळजी करण्यासारखे नाही, मात्र…
राज्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र ही लाट सौम्य असेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. सर्दी, खोकला, ताप या आजाराचे रुग्ण मागील एक-दोन महिन्यात खूप कमी झाले होते. मात्र आता त्यात वाढ झाली आहे. त्यातील बऱ्याचजणांना कोरोनाची लागण झाल्याचेही दिसून येत आहे. राज्यात कोरोनाचा नवाच व्हेरिएंट आढळला आहे. त्यामुळे काळजी वाढली आहे. बी. ए 5 या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारने जरी सक्ती केली नसली तरी मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. कारण ही एकच गोष्ट आपले अधिक संरक्षण करू शकते. सवय राहण्यासाठी आणि सरंक्षण अशा दोन्ही कारणांसाठी मास्क शक्य तितका वापरावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.