Vasant More : ‘…तर मात्र इतिहास यांना माफ करणार नाही’, नाना वाड्याच्या दुरवस्थेवर वसंत मोरेंनी व्यक्त केली नाराजी
नागरिकांना या वास्तू पाहायला मिळू शकतात. महापालिका करोडो रुपये यासाठी खर्च करते. मात्र आज या वाड्याची दुरवस्था झाली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
पुणे : 100 नगरसेवक असलेली सत्ता संपली, पण या वाड्याचे दुर्दैव आजून संपले नाही. जर यात सुधारणा केली नाही तर मात्र इतिहास यांना माफ करणार नाही, अशी नाराजी मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी व्यक्त केली आहे. पुण्यातील ऐतिहासिक नाना वाड्याला भेट दिल्यानंतर त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. पुणे मनपाच्या (PMC) मालकीचा 1780 साली पेशव्यांचे प्रमुख कारभारी नाना फडणीस (Nana Phadnis) यांनी त्यांना राहण्यासाठी बांधलेला हा नाना वाडा प्रसिद्ध लाल महालसमोर आहे. या ठिकाणी पुणे मनपाचा रेकॉर्ड विभाग आहे. लाखो कागदपत्रे इकडे आहेत, त्यामुळे ही वास्तू अजून धोकादायक झाली आहे. एक शाळा, एक अभ्यासिका, एक नृत्य क्लास असे अनावश्यक विषय इथे आहेत. लवकरच या सर्वांना बाहेर काढून ही वास्तू पुन्हा आहे तशी करावी, अशी मागणी वसंत मोरे यांनी केली आहे.
‘पेशवेकालीन वास्तूचे उत्तम उदाहरण’
पेशवेकालीन वास्तूचे उत्तम उदाहरण म्हणजे ही वास्तू आहे. अतिशय आखीवरेखीव, सुंदर असे काम या वाड्याचे झालेले पाहायला मिळते. 20 गुंठ्यांमध्ये ही वास्तू आहे. लाकडी काम करण्यात आले आहे. सुरू आणि सागवान या माध्यमातून काम झाले आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची शाळा येथे चालवली जाते. 1953साली पुणे महापालिकेने ही वास्तू विकत घेतली. महापालिकेकडे नाना वाडा, विश्रामबाग वाडा, लाल महाल आणि महात्मा फुले मंडई अशा चार वास्तू महापालिकेकडे आहेत, असे वसंत मोरे म्हणाले. नागरिकांना या वास्तू पाहायला मिळू शकतात. महापालिका करोडो रुपये यासाठी खर्च करते. मात्र आज या वाड्याची दुरवस्था झाली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
नाना वाड्यातून वसंत मोरेंचे फेसबुक लाइव्ह
‘या वास्तू आपल्याला पुन्हा मिळणार नाहीत’
लाकडाला हात लावल्यास पूर्ण धूळ हाताला लागते. अनेक ठिकाणी जाळ्या झाल्या आहेत. काम सुरू असल्यामुळे हा वाडा नागरिकांसाठी बंद आहे. वाड्याच्या जतनाचे काम 2010पासून सुरू झाले. आजघडीला महापालिकेचे एक रेकॉर्ड रूम आहे. त्याची कागदपत्रे पाहायला मिळतात. महापालिकेच्या ताब्यात आहे, याचा अर्थ अशाप्रकारची कार्यालये येथे उभारणे गरजेचे नाही. यासह इतर वास्तूंमधील कार्यालये तातडीने हटवा, अशी मागणी वसंत मोरेंनी केली. उंदीर, घुशींची साम्राज्य याठिकाणी पाहायला मिळत आहे. कितीही बजेट खर्च केले तरी या वास्तू आपल्याला पुन्हा मिळणार नाहीत, असे मोरे म्हणाले.