Madhu Patil : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नात डॉ. मधू पाटील यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या त्या नात होत. घरातील पहिली मुलगी म्हणून दादांचा त्यांच्यावर जीव होता. त्यांना प्रेमाने चिमुताई म्हणून ओळखले जात होते. लहानपणी त्यांच्यावर इंग्लंडमध्ये दोन वेळा हृदय शस्त्रक्रिया झाल्या होत्या.
सांगली/पुणे : डॉ. मधू प्रकाश पाटील (Madhu Patil) यांचे काल रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या वय 44 वर्षांच्या होत्या. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (Former chief minister Vasantdada Patil) यांची नात, काँग्रेसचे खासदार स्व. प्रकाशबापू पाटील आणि काँग्रेसच्या नेत्या श्रीमती शैलजा पाटील यांच्या कन्या, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या त्या भगिनी होत. त्यांच्या पार्थिवावर आज शनिवारी पद्माळे येथे अंत्यसंस्कार होत आहेत. काल रात्री आठच्या सुमारास पुणे येथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का (Heart attack) बसला. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आरोग्य क्षेत्रातून दु:ख व्यक्त होत आहे.
दोन वेळा हृदय शस्त्रक्रिया
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या त्या नात होत. घरातील पहिली मुलगी म्हणून दादांचा त्यांच्यावर जीव होता. त्यांना प्रेमाने चिमुताई म्हणून ओळखले जात होते. लहानपणी त्यांच्यावर इंग्लंडमध्ये दोन वेळा हृदय शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यानंतर आणखी एकदा त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तरीही त्यांनी जिद्दीने वैद्यकीय शिक्षण घेतले आणि जनतेच्या सेवेत स्वतःला झोकून दिले. सांगलीत नांद्रे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी सामान्य जनतेसाठी झटून काम केले होते.
कोरोनाकाळात रुग्णसेवा
बोगस डॉक्टर विरोधात त्यांनी सुरू केलेली मोहीमही चांगलीच गाजली होती. राज्यात बोगस डॉक्टरांचा सुटसुळाट आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची, रुग्णांची होणारी फसवणूक तसेच आरोग्याचे नुकसान यावर त्यांनी कार्य केले. कोरोना काळातही त्यांनी मोठ्या हिंमतीने रुग्णांना सेवा देऊन कोरोनावर मात करण्यात मदत केली होती. आपल्या प्रेमळ स्वभावाने त्यांनी अनेक रुग्णांना उपचाराबरोबरच दिलासा देऊन बरे केले होते. सध्या त्या पुणे येथे आरोग्य उपसंचालक कार्यालयात सेवेत होत्या. त्यांच्या जाण्याने आरोग्य क्षेत्रासह राजकीय क्षेत्रातूनही दु:ख व्यक्त होत आहे.