Vijay Shivtare : हकालपट्टी झालेल्या विजय शिवतारेंनी उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, बॅनरवर फोटो कुणाचे?
विजय शिवतारे हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. पुण्यातील पुरंदर तालुक्यातून शिवसेनेचे ते प्रतिनिधीत्व करत होते. विजय शिवतारे यांनी शिंदे गटाला समर्थन दिल्यानंतर पक्षविरोधी कारवाया केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवत हकालपट्टीची कारवाई करण्यात आली.
पुणे : शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ज्या बॅनरवर त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, त्यात पक्षप्रमुख असा उल्लेख करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातून विजय शिवतारे माजी राज्यमंत्री राहिलेले आहेत. पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांची नुकतीच शिवसेनेतून (Shivsena) हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या बॅनरवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचेही फोटो आहेत, हे विशेष… फेसबुकवर पोस्ट करत त्यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतून 40 आमदार फुटले. त्यांना समर्थन देणाऱ्या शिवसैनिकांत विजय शिवतारे यांचा समावेश आहे. त्यामुळे पक्षाने त्यांची हकालपट्टी केली.
बॅनरवर कोणाकोणाचे फोटो?
जलसंपदा आणि जलसंधारण खात्याचे माजी राज्यमंत्री राहिलेल्या विजय शिवतारेंनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा तर दिल्या. मात्र या बॅनरवर बंड केलेले एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे. त्यांच्याशिवाय भाजपाच्या नेत्यांच्या फोटोचा समावेश केलेला दिसतो. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही या फोटोमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर सशक्त महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी ठाकरे आपणांस वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! अशा आशयाची ही फेसबुक पोस्ट करण्यात आली आहे.
पक्षविरोधी कारवाया केल्याने कारवाई
विजय शिवतारे हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. पुण्यातील पुरंदर तालुक्यातून शिवसेनेचे ते प्रतिनिधीत्व करत होते. विजय शिवतारे यांनी शिंदे गटाला समर्थन दिल्यानंतर पक्षविरोधी कारवाया केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवत हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. त्यांच्यासह जे शिवसैनिक शिंदे गटाला समर्थन करत आहेत, अशांवरही शिवसेना पक्षातर्फे कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला आहे.