Pune Leopard attack : पुण्याच्या खेड, आंबेगावातले ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीत! वनविभागानं पिंजरे तर लावले, पण…
रेटवडी परिसरात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. वन्यप्राण्यांना पाणवठ्याची व्यवस्था करणे गरजेचे असताना कोणतेही उपाययोजना केली जात नाही. पर्यायाने पाणी आणि भक्ष्यांच्या शोधात हे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येत आहेत आणि मानवावर प्राणघातक हल्ले करत आहेत.
पुणे : पुणे जिल्ह्यात मागील तीन दिवसांत बिबट्याने माणसांवर हल्ला (Leopard attack) करण्याच्या तीन घटना घडल्या. यामुळे खेड, आंबेगाव परिसरातील ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. यात एक महिला गंभीर असून इतर दोन जणांवर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर बिबट्याची माहिती घेऊन उपाययोजना करण्यासाठी राजगुरूनगर वनविभाग व माणिकडोह येथील वनविभागाच्या (Forest department) अधिकारी पथकाने परिसर पिंजून काढायला सुरुवात केली आहे. तसेच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन ठिकाणी पिंजरा लावला. मात्र बिबट्या हाती येण्याऐवजी तिसरा हल्ला झाल्याने वनविभागाचे प्रयत्न वाया गेले आहेत. काल सकाळी घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एस. रौन्धळ, दत्तात्रय फापाळे, शिवाजी राठोड, संदीप अरुण असे पथक या ठिकाणी पोहोचले. ग्रामस्थांनी तोपर्यंत जखमी महिलेला उपचारासाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयात (Hospital) दाखल केले होते.
लोडशेडिंगमुळे रात्री द्यावे लागते पीकांना पाणी
नागरिक मात्र भीतीने गांगरून गेले आहेत. रात्रीची दहशत आहेच. मात्र आता दिवसा बाहेर पडायलाही नागरिक घाबरू लागले आहेत. चासकमान धरणाचा डावा कालवा या परिसरातून जातो. पाण्याची मुबलकता असल्याने शेतकऱ्यांनी बागायती पिके घेतली आहेत. लोडशेडिंगमुळे पिकांना रात्री पाणी द्यावे लागते. मात्र या घटनांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. आता शेतात जाऊन काम करणेसुद्धा जीवावर बेतू शकते, म्हणून शेतात कोणी जात नाही. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
पिंजऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी
या भागातील रेटवडी, भांबुरवाडी, जऊळके या भागात वनविभागाने पिंजऱ्यांची संख्या वाढविण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे. तर वन विभागाला या बिबट्यांना जेरबंद करण्याचे एक मोठे आव्हान असून बिबट्याचे होणारे हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दरम्यान, ड्रोनचाही आधार आता घेतला जाणार आहे.
मानवी वस्तीकडे का येतायत बिबटे?
रेटवडी परिसरात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. अनेक वन्यप्राणी यामध्ये वास्तव करतात. मात्र वनविभाग कोणतीही उपाययोजना वनक्षेत्रात करत नाही. वन्यप्राण्यांना पाणवठ्याची व्यवस्था करणे गरजेचे असताना कोणतेही उपाययोजना केली जात नाही. पर्यायाने पाणी आणि भक्ष्यांच्या शोधात हे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येत आहेत आणि मानवावर प्राणघातक हल्ले करत आहेत. वनविभागाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तर या भागतील नागरिक मात्र बिबट्याच्या दहशतीत वावरत आहेत.