VHP protest : जिहादी असलेल्या धर्मांधांकडून राजस्थान, अमरावतीतील हत्या, विश्व हिंदू परिषदेचा आरोप; पुण्यात घोषणाबाजी करत आंदोलन
राजस्थान आणि महाराष्ट्रात झालेल्या या दोन्ही हत्या जिहादी मानसिकता असणाऱ्या धर्मांध लोकांकडून झाल्या आहेत. या हत्या आतंकवादी पद्धतीने करण्यात आल्या असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
पुणे : राजस्थान आणि अमरावती येथे झालेल्या हिंदुंच्या दोन हत्या आतंकवादी पद्धतीने करण्यात आल्या, असा आरोप विश्व हिंदू परिषदेने (Vishva Hindu Parishad) केला आहे. या घटनेचा निषेध करत विश्व हिंदू परिषदेने पुण्यात आंदोलन केले. पुण्यातील बालगंधर्व चौकात जोरदार घोषणाबाजी करत विश्व हिंदू परिषदेने हे आंदोलन केले आहे. केंद्र सरकारने या दोन्ही घटनेचा तपास करून आरोपींना फासावर लटकवावे, अशी मागणीदेखील आंदोलनकर्त्यांनी केली आहे. भाजपाच्या नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला पाठिंबा देत त्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट लिहिली म्हणून काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील कन्हैया लाल यांची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली होती. त्याचबरोबर राज्यातील अमरावती शहरात राहणाऱ्या उमेश कोल्हे यांची देखील काल अशीच हत्या करण्यात आली आहे. त्याचा निषेध करण्यात आला आहे.
नुपूर शर्मा समर्थन भोवले
राजस्थान आणि महाराष्ट्रात झालेल्या या दोन्ही हत्या जिहादी मानसिकता असणाऱ्या धर्मांध लोकांकडून झाल्या आहेत. या हत्या आतंकवादी पद्धतीने करण्यात आल्या असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. उमेश कोल्हे (54) यांच्या हत्येमुळे अमरावतीत खळबळ उडाली आहे. भाजपा नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरला आहे. कोल्हे यांचे स्वत:चे मेडिकल स्टोअर आहे. 21 जून 2022ला ते रात्री उशीरा आपल्या मेडिकलमधून घरी जात असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. घरी परतत असताना हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यात गाठून चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात ते ठार झाले.
राजस्थानातले प्रकरण काय?
नुपूर शर्मा प्रकरणीच उदयपूरमध्ये कन्हैयालाल नावाच्या टेलरची हत्या झाली होती. शहरातील गजबजलेल्या मालदास स्ट्रीट येथे हा प्रकार घडला. मृत कन्हैयालाल टेलर त्याच्या टेलरिंगच्या दुकानात होता. यावेळी दोन तरूण धारदार शस्त्रे घेऊन आले आणि त्यांनी कन्हैयालाल याच्यावर हल्ला केला. यावेळी आजूबाजूचे लोक बचावासाठी येत होते, त्याआधीच आरोपी पळून गेले. यानंतर घंटाघर पोलीस घटनास्थळी दाखल होताच व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. यानंतर दुकाने बंद करण्यात आली होती, तसेच पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता.