Pune Water : पुणे महापालिकेनं काम तर पूर्ण केलं, पण अजूनही सिंहगड रोड, धायरी परिसरातल्या नागरिकांची पाणीसमस्या ‘जैसे थे’च!
स्थानिक रहिवाशांच्या मते, धायरी येथे अनेक दिवसांपासून पाणीटंचाई जाणवत आहे. 2017मध्ये हे क्षेत्र पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झाले. त्यानंतरही पाणीपुरवठ्याच्या समस्येत फारसा बदल किंवा सुधारणा झाली नाही.
पुणे : सिंहगड रोडलगत असलेल्या धायरी (Dhayari) आणि त्याच्या लगतच्या भागातील हजारो रहिवाशांना गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी मिळत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी येथील रहिवासी करीत आहेत. पुणे महानगरपालिकेने (Pune municipal corporation) पाणीपुरवठ्याला चालना देण्यासाठी अतिरिक्त पाणी कनेक्शन देण्याचे काम पूर्ण केले आहे. नागरी अधिकारी आणि स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांनी सांगितल्यानुसार, काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा पुरवठा (Water supply) हळूहळू सुरळीत केला जाणार आहे. उन्हाळा आणि आता पावसालाही उशीर झाल्याने विहिरींची पाणीपातळी घसरली. त्यामुळे विहिरींद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या या भागात कमी दाबाने पुरवठा होत आहे. कमी झालेल्या पातळीमुळे कमी दाबाचा पुरवठा झाला. स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांनी पुरवठा वाढवण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू करण्यासाठी नागरी प्रशासनाशी संपर्क साधला होता.
‘पुरवठा आणखी वाढेल’
स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांच्या मते, रहिवाशांना पाण्याच्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागत होता. तेव्हा येथील पाइपलाइन नेटवर्कची तपासणी करण्यात आली. पुरवठा वाढविण्यासाठी मुख्य वितरण मार्गावरून अतिरिक्त कनेक्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता अधिक दाबाने पाणी उपसता येते. यामुळे पुरवठा आणखी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
रहिवाशांना करावा लागतोय पाणीटंचाईचा सामना
स्थानिक रहिवाशांच्या मते, धायरी येथे अनेक दिवसांपासून पाणीटंचाई जाणवत आहे. 2017मध्ये हे क्षेत्र पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झाले. त्यानंतरही पाणीपुरवठ्याच्या समस्येत फारसा बदल किंवा सुधारणा झाली नाही. पाण्याचा अनियमित पुरवठा आणि कमी दाबामुळे अनेक सोसायट्या अजूनही टँकरवर अवलंबून आहेत. परिसरात पाण्याचा पुरवठा वाढविण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र योजना तयार करावी, अशी मागणी आता येथील रहिवासी करीत आहेत.
‘त्रुटी दूर करणार’
पुणे महापालिका अधिकाऱ्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांच्या मते, नुकतेच पाणीपुरवठ्यासंबंधीची काही कामे करण्यात आली आहेत. याचा काय परिमाण होतो, त्याची पाहणी आधी केली जाईल. त्यात काही त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातील आणि आवश्यक ते बदल केले जातील, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.