पुणे जिल्ह्यात पाणी प्रश्न गंभीर; या गावात महिलांना मिळतंय फक्त दोन हंडे पाणी, तिसऱ्या हंड्याला थेट 100 रुपये दंड
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे, या समस्येवर उपाय म्हणून परसुल गावातील ग्रामस्थानी एक अजब फतवा काढला आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे, या समस्येवर उपाय म्हणून परसुल गावातील ग्रामस्थानी एक अजब फतवा काढला आहे, या फतव्याची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. नेमकं काय आहे प्रकरण? काय आहे हा फतवा त्याबद्दल जाणून घेऊयात.
पुणे जिल्ह्यातील खेडच्या पश्चिम भागामध्ये हे परसुल गाव आहे. या परिसरात पावसाळ्यामध्ये जोरदार पाऊस पडतो, मात्र उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होते. त्यामुळे यावर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये, म्हणून येथील नागरिकांनी अजब फतवा काढला आहे. येथे असलेल्या सार्वजनिक पाणिपुरवठ्याच्या विहिरीवरून दिवसभरात एका कुटुंबाला दोनच हंडे पाणी मिळेल, तिसरा हंडा भरणाऱ्या कुटुंबाला शंभर रुपयांचा दंड असा हा फतवा आहे.
या विहिरीत असलेले पाणी जून महिन्यापर्यंत पुरलं पाहिजे यासाठी गावकऱ्यांनी हा अजब निर्णय घेतला आहे , तसेच येथील अनेक कुटुंब उदरनिर्वाहासाठी शहराच्या ठिकाणी वास्तव्य करत असल्याने गावात वयस्कर महिलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी सकाळी सात ते रात्री सहा पर्यंतच विहिरीवरून पाणी आणायचं असा नियमही तयार करण्यात आला आहे.
पाणीटंचाईने पुण्याच्या ग्रामीण भागातील खेड ,आंबेगाव जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील जनता त्रस्त झाली आहे. खेड तालुक्यातील परसूल येथे महिलांना पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली असून, दिवसभरात विहिरीवरून दोनच हंडे घरी पाणी न्यायचं. तिसरा हंडा भरला तर शंभर रुपये दंड भरायचा असा नियमच ग्रामस्थांनी घातला आहे.
पुण्याच्या ग्रामीण भागात कोट्यवधी रुपयांची जलजीवन मिशन योजनेची कामं सुरू आहेत. मात्र, आजही काही गावे तहानलेलीच आहेत. पूर्व भाग व पश्चिम भागातील काही गावाला टँकरचा प्रस्ताव सादर करण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील पश्चिम भागातील परसूल गावात पाण्यासाठी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. अजून दोन महिने कडक उन्हाळ्याचे दिवस असणार आहेत, त्यामुळे गामस्थांसमोर पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.