पुणे : पुण्याला पाणीपुरवठा (Water Supply) करणाऱ्या पानशेत, वरसगाव, खडकवासला, टेमघर या चार धरणांमधील साठा अजूनही 82 टक्क्यांच्या आसपास दिसत आहे. याचे कारण जलसंपदा विभाग डेटा अपडेट (Data update) करण्यात अपयशी ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून जलसंपदा विभाग आपल्या धरणातील पाणीसाठ्याची आकडेवारी अद्ययावत करत नाही, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील धरण (Dam) साठ्याबाबत कोणतीही स्पष्ट कल्पना येत नाही. दरम्यान, मान्सूनच्या आगमनानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेसा पाणीसाठा असल्याची खात्री असलेल्या पाटबंधारे विभागाकडून पाणीकपातीची मागणी नाही. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की सर्व धरणांमध्ये अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी पाणीसाठा कमी असला तरी शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागला नाही. यंदाही पाणीटंचाई भासणार नाही. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण होत आहे.
पाटबंधारे विभाग पाणीटंचाई नाही, असे म्हणत असले तरी पुणे शहरातील अनेक नागरिक पाणीकपात आणि कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी करत आहेत. धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्याने असे होत नसल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. शहराच्या अनेक भागात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे अनेक रहिवाशांना पाणीकपात किंवा कमी दाबाने पाणी मिळत आहे. दुरुस्तीचे काम असेल तरच पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
पीएमसीच्या जल विभागाच्या म्हणण्यानुसार, बहुतेक ठिकाणी वेळेवर पाणी येत असून पेठ भागात कमी दाबाने वाहणाऱ्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. काही ठिकाणी रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामामुळे हे घडले आहे. तर दुसरीकडे मात्र नागरिकांचे हाल सुरूच आहेत. त्यामुळे काही राजकीय पक्षदेखील यात उतरले. अनेक ठिकाणी मोर्चे तसेच आंदोलनेही होत आहेत. आता जूनपर्यंत पाणीपुरवठा विभाग याचे नियोजन कसे करतो, ते पाहावे लागेल.