गुरुवारी पुण्यातील पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागात पाणी येणार नाही?
लष्कर आणि नवीन होळकर जलकेंद्राच्या तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवारी कमी दाबाने आणि उशिरा हा पाणीपुरवठा केला जाणार आहे.
पुणे : गुरुवारी पुणे शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. लष्कर आणि नवीन होळकर जलकेंद्राच्या तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवारी कमी दाबाने आणि उशिरा हा पाणीपुरवठा केला जाणार आहे. पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने ही माहिती दिली आहे.(Water supply will be cut off in some parts of Pune)
कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार?
लष्कर जलकेंद्र भाग –
लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणी नगर, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सावंतवाडी, इत्यादी.
नवीन होळकर आणि चिखली पंपींग भाग –
विद्यानगर, टिंगरे नगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रोड परिसर, इत्यादी.
पुण्यातील शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंद
महानगरपालिका हद्दीत कोरोना संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग 14 मार्च 2021 पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. रात्री 11 ते सकाळी 6 संचाराचे निर्बंध कायम असणार आहे. रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत पुणे महानगरपालिका हद्दीत संचार निर्बंध कायम ठेवण्यात आले असून अत्यावश्यक सेवा, शिफ्ट मध्ये कामकाज करणाऱ्यांना यात मुभा देण्यात येत आहे. तर अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई सुरु राहणार आहे.
तीन ठिकाणी कोव्हिड सेंटर
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. काल तर एकाच दिवशी जवळपास कोरोनाचे सातशे रुग्ण आढळून आले. यानंतर महापालिका अगदी अलर्ट झाली आहे. रक्षक नगर, गणेश कला क्रीडा मंडळ, पठारे स्टेडियम या तीन ठिकाणी महापालिका कोव्हिड सेंटर सुरू करणार आहे.
रक्षक नगर, गणेश कला क्रीडा मंडळ, पठारे स्टेडियम या तिन्ही सेंटरवर 500 बेड्स उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रुग्णांना बेड्स मिळणं सुलभ होणार आहे. येत्या दोन दिवसांत हे सेंटर पुन्हा सुरु करणार असल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या :
पुण्यात कोरोना नियमांचे ऐशीतैशी, रात्री उशिरापर्यंत पब सुरुच, अनेक तरुण-तरुणींवर गुन्हा दाखल
गॅलरीत खेळताना तोल गेला, पिंपरीत सातव्या मजल्यावरुन पडून 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Water supply will be cut off in some parts of Pune