कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत हे काय चाललंय; पैशांची पॉकीटं घेऊन येणारे कोण?
कमळाला मतदान करा म्हणून पैसे वाटप करण्यासाठी काही कार्यकर्ते आले होते. आम्ही त्यांना पैसे नको असल्याचं सांगितलं. ज्यांना मतदार करायचं त्यांना करणार असंही सांगितल्याचं महिला म्हणाल्या.
पुणे : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कंट्रोल रुम तयार करण्यात आला आहे. वेब कास्टिंगद्वारे कसब्यातील 135 आणि चिंचवडमधील 255 एकूण मतदान केंद्रावर लक्ष असणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कंट्रोल रूम तयार करण्यात आला आहे. असं असलं तरी काही ठिकाणी रात्री मारामारी झाल्याचा आरोप काही महिलांनी केला. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये या निवडणुकीत जोराची टक्कर आहे. मतदान सुरू आहे. तत्पूर्वी काल रात्र काही गोष्टी घडल्या. त्या आता समोर येत आहेत. कसब्यात काल रात्री भाजप कार्यकर्त्यांकडून महिलेला मारहाण झाल्याचा आरोप आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर हे गंभीर आरोप केलेत.
पीडित महिलांचं म्हणणं काय?
महिला म्हणाल्या, मारामारी झालेली आहे. आम्ही दारात होतो. लेकरं झोपली होती. भाजपचे काही कार्यकर्ते आले. ते पैसे द्यायला लागले. आजूबाजूच्या महिला जमा झाल्या. पैसे वाटू नका, असं सांगितलं. त्यानंतर तिथं भांडण झालं. कमळाला मतदान करा म्हणून पैसे वाटप करण्यासाठी काही कार्यकर्ते आले होते. आम्ही त्यांना पैसे नको असल्याचं सांगितलं. ज्यांना मतदार करायचं त्यांना करणार असंही सांगितल्याचं महिला म्हणाल्या.
आरोपींना अटक का नाही ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष म्हणाले, वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता धर्मा कांबळे यांच्या घरात घुसून त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली. भाजपचे माजी नगरसेवक विष्णू हरिहर, त्यांचा पुतण्या निर्मल हरिहर आणि हिरा हरिहर यांनी ही मारहाण केली. महिलांना मारहाण करण्यात आली. अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा नोंदवायला हवा. या आरोपींना तात्काळ अटक होणे अपेक्षित होते. पण, त्यांना अद्याप अटक करण्यात आली नाही. हे आरोप सर्व मतदान केंद्रावर सर्वत्र फिरताना दिसत आहेत. असा आरोपही त्यांनी केला.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर निवडणूक मैदानात आहेत. हिंदू महासंघाचे आनंद दवेही मैदानात आहेत. त्यामुळे या लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे.