Pune : क्रिकेट खेळता खेळता दम लागला अन् जागेवरच गेला! 22 वर्षीय तरुणाच्या मृत्यूनं पुण्यातल्या हडपसरमध्ये शोककळा
श्रीतेज हा हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन घुले आणि उंड्री गावच्या माजी सरपंच श्वेता घुले यांचा मुलगा होता. श्रीतेजचा मित्र परिवारदेखील मोठा होता. त्याच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पुणे : क्रिकेट (Cricket) खेळताना दम लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील हडपसरच्या हांडेवाडी येथील मैदानावर हा प्रकार घडला आहे. श्रीतेज सचिन घुले (वय 22) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास श्रीतेज घुले हा क्रिकेट खेळण्यासाठी मित्रांसोबत घराबाहेर पडला. खेळता खेळता त्याला अचानक दम (Tired) लागला आणि त्यातच तो खाली पडला. त्याच्यासोबतच्या मित्रांनी त्याला पाणी पाजण्याचा तसेच पाण्याचे शिडकावे करत उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काहीच प्रतिसाद देत नव्हता. तेव्हा मित्रांनी तत्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला तपासले. मात्र दुर्दैवाने त्याचा प्राण गेला होता. त्याचा मृत्यू (Dead) झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
मोठा होता मित्रपरिवार
या घटनेनंतर त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या मित्र परिवारात तसेच हडपसर परिसरात अत्यंत शोकाचे वातावरण आहे. श्रीतेज हा हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन घुले आणि उंड्री गावच्या माजी सरपंच श्वेता घुले यांचा मुलगा होता. श्रीतेजचा मित्र परिवारदेखील मोठा होता. त्याच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कमी वयात मृत पावण्याच्या घटना वाढल्या
खेळता खेळता अचानक दम लागल्याने मृत्यू होण्याचे नेमके कारण काय, श्रीतेजला कोणता आजार होता का, खूप जास्त शारीरिक-मानसिक ताण आला होता का, हे आणि असे अनेक प्रश्न यानिमित्ताने समोर आले आहेत. कमी वयात मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. तिशी तर लांबच मात्र पंचविशीच्या आतदेखील तरुणांचे मृत्यू विचार करायला लावणारे आहेत. मागे जीममध्ये व्यायाम करता करता एका तरुणाचा दम लागून मृत्यू झाला. तर एका रेडिओ जॉकी असणाऱ्या तेवीस वर्षीय तरुणाचा ऑफिसमध्येच मृत्यू झाला होता. यासह इतर अनेक घटनांमध्ये अकाली मृत्यू होण्याचे वाढते प्रमाण चिंता करायला लावणारे आहे.