संसद परिसरात गोंधळ घालणाऱ्या अमोल शिंदेला कायदेशीर मदत करणारे वकील असिम सरोदे कोण?
Who in Asim Sarode : काल संसदेत मोठा गोंधळ झाला. दोन तरूणांनी लोकसभेत स्मोक कँडलने गोंधळ उडवून दिला. तर दोघांनी संसदेबाहेर गोंधळ घातला. संसद परिसरात गोंधळ घालणाऱ्या अमोल शिंदेला वकील असिम सरोदे यांनी कायदेशीर मदत करण्याचं जाहीर कलंय. वकील असिम सरोदे कोण आहेत? वाचा...
योगेश बोरसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 14 डिसेंबर 2023 : भारतीय संसद… जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाची सर्वात महत्वाची इमारत… याच संसदेतून देशाच्या भवितव्यासाठी कायदे केले जातात. त्याच संसदेत काल गोंधळ पाहायला मिळाला. चार तरूणांनी संसद परिसरात धुमाकूळ घातला अन् याचे पडसाद देशभरात उमटले. संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. 2001 ला झालेल्या संसद हल्ल्याची आठवण करून देणाऱ्या या घटनेचं महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्याशी थेट कनेक्शन आहे. लातूरमधल्या झरे गावातील तरूण अमोल शिंदे या सगळ्या प्रकारात सामील होता. या अमोल शिंदेला अॅड. असिम सरोदे कायदेशीर मदत करणार आहेत. अमोल शिंदे याला मदत जाहीर केल्यानंतर असिम सरोदे नेमके कोण? याची चर्चा होऊ लागली. चला तर मग जाणून घेऊयात…
कोण आहेत असिम सरोदे?
असिम सरोदे हे प्रसिद्ध वकील आहेत. त्यांचा कायदेशीर अभ्यास दांडगा आहे. भारतीय संविधानाचा त्यांचा अभ्यास आहे. विविध सामाजिक राजकीय मुद्द्यांवर परखड मतं असिम सरोदे मांडत असतात. मानवी हक्कांवर त्यांचा सखोल अभ्यास आहे. मानवी हक्कांवर ते आपली मतं मांडत असतात. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण बार असोसिएशन पुणेचे असिम सरोदे अध्यक्ष आहेत. व्ही. मानवी हक्क विश्लेषक ते आहेत. सामाजिक आणि कायदेशीर बाबींवर त्यांचं लेखन प्रसिद्ध आहेत.
अमोल शिंदेबाबत असिम सरोदे यांचं मत काय?
अमोल शिंदे याला आपण कायदेशीरित्या मदत करणार असल्याचं असिम यांनी जाहीर केलं. काहीवेळा आधी त्यांनी फेसबुक पोस्ट लिहित अमोल शिंदेला मदत करण्याबाबत जाहीर भूमिका घेतली. अमोल शिंदे याने काल संसदेत घुसून बेरोजगारीचा प्रश्न धुराचे नळकांडे फोडून मांडला. त्याने वापरलेली भगतसिंग स्टाईल लोकशाहीला साजेशी नाही. पण मग संसदेतील लोकही असे कोणते काम करीत आहेत ज्यातून अनेक हातांना रोजगार मिळेल, महागाई कमी होईल, असं असिम सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अमोलचा उद्देश जर कुणाला दुखावण्याचा व इजा करण्याचा नव्हता आणि त्याला केवळ बेरोजगारीचा मुद्दा त्याला मांडायचा होता तर त्याचे गुन्हेगारीकरण न करता बेरोजगारीचा प्रश्न समजून घेतला पाहिजे. आणि त्याने वापरलेल्या चुकीच्या मार्गाबद्दल जाणीव देऊन त्याला सकारात्मक शिक्षा जरूर करावी असे मला वाटते, असंही असिम सरोदे म्हणाले आहेत.