गिरीश बापट यांचा वारस कोण?; पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून 5 तर काँग्रेसमधून दोघांची नावे चर्चेत
तर दुसरीकडे भाजपकडून गिरीश बापट यांच्या घरातच उमेदवारी देऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याचं भाजपचा प्रयत्न असणार आहे. तशी विनंती भाजपकडून महाविकास आघाडीला केली जाणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं.
पुणे : भाजप नेते गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. येत्या सहा महिन्यात ही निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वीच आता गिरीश बापट यांचा वारस कोण? अशी चर्चा रंगली आहे. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सर्वाधिक लॉबिंग भाजपमध्येच सुरू असल्याचं दिसत आहे. या जागेसाठी भाजपमधून एकूण पाच जण स्पर्धेत आहेत. त्यात माजी खासदारांचाही समावेश आहे. तर बापट यांच्या सूनेच्या नावाचीही चर्चा आहे. तर काँग्रेसमधून दोन जणांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजपमधून कुणाला आणि काँग्रेसमधून कुणाला उमेदवारी दिली जातेय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागणार आहे. वर्षभरापेक्षा जास्त कालावधी शिल्लक असल्यामुळे निवडणूक लागण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनेही निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करून टाकलं आहे. मात्र, ही निवडणूक बिनविरोध करण्यावर भाजपचा भर असणार आहे. खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे, वर्षभरापेक्षा जास्त कालावधी शिल्लक असल्यामुळे पोटनिवडणूक लागेल, असं मत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केलंय.
पाच नावे चर्चेत
ही पोटनिवडणूक लागण्याआधीच उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे, काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी आणि अरविंद शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपमधून एकूण पाच जणांच्या नावांची सध्या चर्चा आहे. माजी खासदार संजय काकडे, मुरलीधर मोहोळ, सिद्धार्थ शिरोळे आणि जगदीश मुळीक यांची नावे भाजपमधून चर्चेत आहेत. मात्र बापट यांची सून स्वरदा बापट यांना उमेदवारी देऊन भाजप निवडणूक बिनविरोध करण्याची शक्यता अधिक आहे.
कसब्याची पुनरावृत्ती टाळणार?
भाजपकडून पुणे लोकसभा निवडणुकीत बापट यांची सून स्वरदा बापट यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे. कसब्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजप बापट यांच्या सूनेला तिकीट देण्याची शक्यता आहे. स्वरदा बापट यांना तिकीट मिळाल्यास काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार नसल्याची शक्यता आहे. मात्र, इतरांना उमेदवारी दिल्यास भाजपमधूनच नाराजीचा सूर उमटू शकतो. कसब्यात जे झालं तेच लोकसभेला होऊ शकतं. त्यामुळे बापट यांच्या कुटुंबीयांना डावलणं भाजपला परवडणारं नसेल, असं सूत्रांनी सांगितलं.
काँग्रेस लढणार
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत पुणे लोकसभेची जागा काँग्रेसच्या वाट्याला होती. तर शिवसेना आणि भाजपच्या युतीत ही जागा भाजपच्या वाट्याला होती. त्यामुळे काँग्रेसने या जागेवर दावा केला आहे. आम्ही पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची जागा लढवणार आहोत. भाजपने यापूर्वीही पोटनिवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे आम्ही लढणार आहोत. बिनविरोध करण्याचा प्रश्नच येत नाही, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कालच स्पष्ट केलंय.