VIDEO: सावरकरांना भारतरत्न कधी देणार?; संजय राऊतांचा आता थेट मोहन भागवतांनाच सवाल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सावरकरांचं हिंदुत्व हेच खरं राष्ट्रीयत्व आहे असं म्हटलं होतं. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Why no Bharat Ratna for Savarkar yet? Shiv Sena’s Sanjay Raut asks Mohan Bhagwat)
पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सावरकरांचं हिंदुत्व हेच खरं राष्ट्रीयत्व आहे असं म्हटलं होतं. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भागवत नवीन काय म्हणाले? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हे या आधीच सांगितलेलं आहे, असं सांगतानाच मोहन भागवत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला सावरकरांविषयी एवढंच प्रेम आलं असेल तर सावरकरांना भारतरत्न कधी देणार ते सांगा?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत पुण्यात आहेत. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं. यावेळी त्यांचं मोहन भागवतांच्या विधानाकडे लक्ष वेधण्यात आलं. त्यावर मोहन भागवतांनी नवीन काय सांगितलं? बाळसााहेब ठाकरेंनी वारंवार हेच सांगितलं आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा विचारच बाळासाहेबांचा आहे, असं सांगतानाच संघाने आता कोणत्या भूमिका घ्याव्यात आणि कधी घ्याव्यात हा त्यांचा प्रश्न आहे. पण वीर सावरकरांच्या संदर्भात शिवसेनेची भूमिका कायम तीच राहिली आहे. वीर सावकर हे आमचे कायम आदर्श राहिले आणि राहतील. म्हणून आजही सांगतो मोहन भागवत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपला सावरकरांविषयी प्रेम आलंय तर त्याचं आम्ही स्वागत करतो. फक्त त्यांना भारतरत्न केव्हा देणार एवढच विचारतो, असं राऊत म्हणाले.
काहींना वाटतं अजूनही यौवनात मी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत असल्याचं म्हटलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. काही लोकांना अजूनही यौवनात मी असं कधी कधी वाटतं. अजूही यौवनात मी असं एक नाटक फार गाजलंय हे नाटक चिरतरुण नाटक होतं. तसं अजूनही अनेकांना वाटतं अजूनही यौवनात मी, अजूनही मुख्यमंत्री मी. आम्हाला कधी कधी दिल्लीत गेल्यावर वाटतं आपलाच पंतप्रधान मंत्री होणार तसंच हे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
त्यांचं आयुष्य स्वप्नात जावो
त्यांची भावना काही असेल, पण त्यांची भावना योग्य आहे. स्वप्नात रममाण व्हावं माणसांनी. चांगली स्वप्नं पाहावीत. पंखांना बळ असावं. त्यांच्या पंखात अधिक ताकद येवो, स्वप्न पाहण्यासाठी आणि आकाशात उडण्यासाठी, अशा माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांचं आयुष्य स्वप्नात जावो, असा चिमटाही त्यांनी काढला.
ठाकरे-पवार पॅटर्नचा बोलबाला
राज्यात अनेक पॅटर्न येतात आणि जातात. पण सध्या महाराष्ट्रात ठाकरे-पवार पॅटर्नचा बोलबाला आहे. हा एक चलनी पॅटर्न आहे. दोन प्रमुख पक्ष, त्यात काँग्रेसची सोबत आली तर काय होऊ शकतं हे सर्वांनी पाहिलं आहे. आम्ही आगामी महापालिका निवडणुकीत कोणत्याही मतांचं विभाजन होऊ देणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
महापौर आमचाच
पुणे आणि पिंपरी चिंचवडला महापौर आमचा असेल, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. मात्र, यावेळी बोलताना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाही उल्लेख केला. तसंच आम्ही जुळवून घेण्याचा प्रयत्न करु, असंही राऊत यावेळी म्हणाले. पुण्यासारख्या शहरात शिवसेनेचाही महापौर असावा अशी पुणेकरांचीच इच्छा असल्याचं सूचक वक्तव्य राऊत यांनी केलंय. राऊतांच्या या वक्तव्यामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झालीय. बाळासाहेब ठाकरे सातत्यानं पुण्यात येत होते. आम्ही पुण्यात संघटनेचं काम करतो. तरी आमचा पुण्यात महापौर बसू शकला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांची, पुणेकरांची इच्छा आहे. आमचं स्वप्न आहे की पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांवर शिवसेनेचा महापौर असावा, असंही राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या:
‘ते’ महात्मा गांधींना हटवून सावरकरांना राष्ट्रपिताही बनवतील; ओवेसींचा राजनाथ सिंहांना टोला
(Why no Bharat Ratna for Savarkar yet? Shiv Sena’s Sanjay Raut asks Mohan Bhagwat)