नारायणगाव, पुणे : पैशाचे आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक करणाऱ्या भोंदुबाबाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. जमिनीतून धन काढून देतो, असे सांगून महिलेची फसवणूक (Cheating) करण्यात आली आहे. वारूळवाडी (ता. जुन्नर) येथील ही महिला असून तिची 9 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी (Narayangaon Police) आळे (ता. जुन्नर) येथील भोंदूबाबावर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. या प्रकरणी निर्मला रमेश नारायणकर (वय 51) या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून भोंदूबाबा अब्दुल सलाम अब्दुल कासिम इनामदार (वय 42, रा. साईव्हिला अपार्टमेंट, पाचवा मजला, रूम नंबर 502, आळे, ता. जुन्नर) याच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे.
आरोपी अब्दुल सलाम अब्दुल कासिम इनामदार याची आणि महिलेची ओळख झाली होती. आरोपीने मी मांत्रिक बाबा असून माझ्याकडे अदृश्य शक्ती आहेत. त्याद्वारे सर्व घरगुती अडचणी सोडवून घरामध्ये शांतता व वैभव नांदेल, अशी उपायोजना करतो. याशिवाय जमिनीतून धन काढून देतो अशी बतावणी केली. तसेच महिलेचा विश्वास संपादन केला. महिलेचा विश्वास बसल्यानंतर या मांत्रिकाने खर्च म्हणून निर्मला नारायणकर यांच्याकडून वेळोवेळी एकूण 9 लाख 25 हजार रुपयांची रक्कम घेतली.
पैसे तर घेतले मात्र ते परत करण्यात तो टाळाटाळ करू लागला. फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर निर्मला नारायणकर यांनी भोंदूबाबा अब्दुल सलाम अब्दुल कासिम इनामदार याच्याविरुद्ध तक्रार करायचे ठरवले. कारण पैसे मागितले तर जीवे ठार मारण्याची व घराला आग लावून पेटवून देण्याची धमकी भोंदूबाबा इनामदार याने महिलेला दिली होती. शेवटी या भोंदूबाबाच्या दहशतीला कंटाळून शेवटी नारायणकर यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.