संजय दुधाणे, पुणे : जागतिक कुस्ती स्पर्धेत सहभागी झालेली पहिली महाराष्ट्रीन महिला कुस्तीगीर कोमल गोळे ही आता सांगलीतील पहिली महिला महाराष्ट्र केसरी किताब जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. सुवर्णकन्या कोमल लग्नानंतरही पुन्हा कुस्ती आखाड्यात उतरली असून सांगलीतील स्पर्धेत ती पुणे संघाकडून झुंजणार आहे.
पहिली महिला महाराष्ट्र केसरी व 24 वी राज्य अजिंक्यपद महिला कुस्ती स्पर्धा सांगलीत सुरू झाली आहे. या स्पर्धेतील महाराष्ट्र केसरी किताबाच्या 65 ते 74 किलो वजनी गटात कोमल खेळणार आहे. कोल्हापुरात राम सारंग यांच्या राष्ट्रकुल कुस्ती संकुलात मेहनत घेऊन कोमलने कुस्तीत पुनरागमन केले आहे. लग्नानंतर काही काळ तिने विश्रांती घेतली होती, कुस्ती प्रशिक्षणाचा एनआयएस अभ्यासक्रम पूर्ण करून तीने वयाच्या 30 व्या वर्षी पुन्हा स्पर्धात्मक कुस्ती खेळण्याचा निर्णय घेतला आहे. 2018 मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यांनंतर तिची 2019 मध्ये जागतिक महिला कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली होती.
सांगलीत प्रथमच होणाऱ्या महिलांच्या महाराष्ट्र केसरी किताबासाठी कोमलने कसून सराव केला आहे. आधी आई-वडीलांचे आता पती संदिप यादव यांची तिला साथ तिला मिळत आहे. फायनल गाठण्यासाठी तिला कोल्हापूर, पुणे, नगर व सांगलीच्या तुल्यबळ खेळाडूंशी शर्थ करावी लागणार आहे. पहिली महाराष्ट्र केसरी होण्यासाठी तिला कोल्हापूर, पुणे, नगर व सांगलीच्या तुल्यबळ खेळाडूंशी शर्थ करावी लागणार आहे.
दरम्यान, लग्नानंतर अनेक महिला आपली स्वप्न विसरून संसाराला लागतात. मात्र कोमलने कस्तीसारख्या खेळात लग्न झाल्यावर वयाच्या 30 व्य वर्षी पुनरागमन करत इतर महिलांसमोर एक आदर्श ठेवला आहे. कोमल तिने घेतलेल्या मेहनतीचा आणि केलेल्या सरावाचा स्पर्धेमध्ये पूर्ण फायदा करून घेईल. पहिली महिला महाराष्ट्र केसरी बनण्याचा किताब आपल्या नावावर करण्याचा तिचा प्रयत्न असणार आहे.