Women’s Day 2023 : पुण्याच्या रमीला लटपटे यांचा नववारीवर बाईकने जगप्रवास
लहानपणी जेव्हा वडील दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देण्यासाठी न्यायचे तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देण्याचा छंद जडल्याचे रमीला सांगतात..
पुणे : तुमची इच्छा असेल तर तुम्ही काहीही करू शकता. केवळ इच्छेच्या बळावर लोक हिमालय सर करतात, अंतराळात मुशाफीरी करतात तर सागराचा तळही गाठून येतात. आता असाच एक दुर्दम्य आशावाद जागवत पुण्याची एक तरूणी चक्क बाईकवरून नववारीमध्ये जगाची सफर करणार आहे. या तरूणीच्या जगाच्या प्रवासाची सुरूवात उद्या सकाळी गेटवे ऑफ इंडीया येथून होणार आहे. ही तरूणी आपल्या जागतिक सफरीत एकूण 20 देशांना भेट देणार आहे.
जगाच्या भ्रमंतीवर निघालेल्या पुण्याच्या तरूणीचे नाव रमीला लटपटे आहे. 27 वर्षीय रमीला लटपटे यांनी आपण महाराष्ट्रीयन संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी चक्क नववारी साडीवर मोटरसायकलवर जगाची सफर करण्याची घोषणा केली आहे. सध्या पुण्यात शिक्षण घेत असलेल्या रमीला या पिंपरी – चिंचवडच्या रहीवासी आहेत. तुम्हाला जर पठडी बाहेरचं आयुष्य जगायचे असेल तर आपल्या अनेक सवयींना बाजूला ठेवावे लागते, कठोर मेहनत करावी लागते. तर आपण प्रवाहाच्या विरोधात पोहून काहीतरी वेगळं करू शकतो. असाच एक नववारी घालून बाईकने जग प्रवासाचा निर्णय रमीला ऊर्फ रमाबाई यांनी घेतला आहे.
20 देशांना वर्षभरात भेट
रमीला यांनी फ्रि प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘ मी माझ्या भ्रमंतीत एकूण अनेक 6 खंड, 12 G – 20 देशांना भेट देणार आहे. एकूण 40 देशातून रस्ता असेल तेथे बाईकवर नववारीवर प्रवास करणार आहे. या प्रवासात आपण महिला गटाने तयार केलेल्या स्थानिक वस्तूंना मार्केट शोधणार आहे. जेथे आपण भेट देणार त्या सर्व स्थळांवर महाराष्ट्रीयन आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करणार असल्याचे रमीला यांनी म्हटले आहे. आपण डिजिटल जगात जगत असूनही आपल्या अनेक परंपरा संस्कृती आणि विविधेचा काही ठिकाणी अजूनही प्रसार झालेला नाही. आपल्या स्थानिक बाजारापेठांमध्ये तयार होत असलेल्या वस्तूंना अजूनही जागतिक बाजारपेठेत ओळख नाही, त्यांना ग्लोबल मार्केट मिळवून देण्यासाठी आपण चार प्रकारच्या साड्याही सोबत घेतल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
सोळाव्या वयापासून एकट्याने प्रवास
आपण सोळाव्या वर्षांनंतर एकट्याने प्रवास करण्याचा उपक्रम सुरू केला, ‘लहानपणी जेव्हा वडील दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देण्यासाठी न्यायचे तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देण्याचा छंद जडल्याचे रमीला सांगतात. या जग सफरीच आपण काही जागांवर कार्यक्रमही सादर करणार आहोत. मध्य प्रदेशच्या माहेश्वरी सिल्क सारख्या रेशमी सारख्या सात प्रकारच्या साड्या आपण सोबत घेतल्या असून त्यांचा प्रसार परदेशात केला जाणार आहे. पुण्याची सामाजिक संस्था अहिल्या फाऊंडेशनने हा दौरा आयोजित केला आहे. उद्या 9 मार्च रोजी सकाळी साडे चार वाजता गेटवे ऑफ इंडीयातून ही सफर सुरू होईल असे रमीला यांनी म्हटले आहे.