पुणे | विनय जगताप | 12 ऑगस्ट 2023 : पुणे – सातारा मार्गावरील खंबाटकी घाटादरम्यान असलेल्या धोम-बलकवडी कॅनॉलमध्ये कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहून जाणाऱ्या पाच प्रवाशांचे प्राण तरुणांनी वाचविल्याची घटना उघडकीस आली आहे. या थरारक घटनेचा मोबाईल व्हीडीओ व्हायरल झाला असून या स्वत:च्या प्राणाची बाजी लावून प्रवाशांचे प्राण वाचविणाऱ्या तरुणांचे सर्वत्र कौतूक होत आहे. एका कंपनीचे कर्मचारी गच्चीवर दुपारचे जेवण करीत असताना त्यांना ही घटना दिसल्याने ते मदतीला धावून गेल्याचे कारमधील प्रवासी वाचल्याचे सूत्रांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात रस्त्यावरुन जाणाऱ्या एर्टीगा कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले. आणि ही कार रस्त्या शेजारील वाहत्या कॅनालमध्ये पडली. ही कार पाण्याच्या वेगाने वाहून जात असताना वेदांत कंपनीचे कामगार आणि स्थानिक तरुणांनी धाव घेतली. कारमध्ये पाच जण प्रवास करत होते. त्यात एक दोन पुरुष, एक महिला आणि दोन अल्पवयीन मुले होती. तरुणांनी तातडीने धाव घेत मदत केल्याने कारमधील पाचही प्रवाशांचे प्राण वाचले.
वेदांत कंपनीतील कामगार कंपनीच्या गच्चीवर जेवण करत असताना त्यांना कारचा अपघात झाल्याही घटना दिसली. कामगारांनी जेवण तसेच सोडून लागलीच घटनास्थळी धाव घेतली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने वाहत्या कारमधील सर्वांना सुखरूप बाहेर काढले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी प्रसाद पांडुरंग गोळे ( शिंद भोर), वेदांत इक्विप सेल्स अँड सर्व्हिस ( खंडाळा ) या कंपनीतीचे कर्मचारी अक्षय कांबळे, लक्ष्मण जगताप, सचिन माने आदींनी एर्टीगा गाडीतील पाच जणांना सुखरुप बाहेर काढल्याने त्यांचे प्राण बचावले आहेत. भोर तालुक्यातील प्रसाद गोळे आणि सहकाऱ्यांनी धाडस दाखवत प्राण वाचविल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.