सुजय विखे शिर्डीत तळ ठोकून, विखे पाटलांकडूनही समीकरणांची जुळवाजुळव
अहमदनगर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची अहमदनगर जिल्ह्यात सभा होणार असतानाच जिल्हा काँग्रेसचे नवनिवार्चित अध्यक्ष करण ससाणे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. केवळ 22 दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकाराने ससाणेंना जिल्हाध्यक्ष करण्यात आलं होतं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आज शिर्डीत पत्रकार परिषद घेणार असून ते काय बोलणार याकडे लक्ष लागलंय. मनाने भाजपवासी झालेले काँग्रेस नेते […]
अहमदनगर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची अहमदनगर जिल्ह्यात सभा होणार असतानाच जिल्हा काँग्रेसचे नवनिवार्चित अध्यक्ष करण ससाणे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. केवळ 22 दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकाराने ससाणेंना जिल्हाध्यक्ष करण्यात आलं होतं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आज शिर्डीत पत्रकार परिषद घेणार असून ते काय बोलणार याकडे लक्ष लागलंय. मनाने भाजपवासी झालेले काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर कारवाईची घोषणा करणार का हे पाहणं महत्त्वाचंय.
विखे पाटलांच्या यंत्रणेच्या हालचाली आणि ससाणे समर्थकांच्या दबावामुळे आज अखेर करण ससाणे यांनी जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मात्र पक्ष सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. ससाणे यांच्या भूमिकेमुळे आमदार बाळासाहेब थोरात यांना चांगलाच धक्का बसला आहे. विखे पाटलांनी आपली राजकीय समीकरणे बदलत बाळासाहेब थोरात यांना शह दिला.
ससाणेंच्या राजीनाम्याचं कारण काय?
साईबाबांच्या झोळीत हात घालणाऱ्याचे कधीच चांगले झाले नाही, असं वकतव्य शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी प्रचारादरम्यान केलं होतं. यामुळे जिल्हाध्यक्ष करण ससाणे समर्थक नाराज होते. समर्थकांनी कांबळे यांचे काम करणार नसल्याची भूमिका या आधीच जाहीर केली होती. समर्थकांची भावना लक्षात घेऊन राजीनाम्याचा निर्णय घेतल्याने जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. करण ससाणे यांनी तटस्थ राहणार असल्याचं जाहीर केलंय. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णा शेलार यांना हटवून करण ससाणे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता विखे पाटीलही काँग्रेसमध्ये नाराज आहेत. करण ससाणे यांचे वडील दिवगंत आमदार जयंत ससाणे साईबाबा संस्थानचे सात वर्षे अध्यक्ष होते, तर काही काळ काँग्रेसचे जिल्हा अध्यक्षही होते. जयंत ससाणे आणि विखे पाटलांचे निकटचे संबंध असल्याने करण ससाणे हे विखे पाटलांच्या भूमिकेविरुद्ध गेले नाहीत. उलट थोरातांची आता मोठी कोंडी झाली आहे.
विखे पाटलांकडून बैठकांचं सत्र सुरु
दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीचं सत्र सुरू केलं असून पक्षाविरोधात त्यांनी भूमिका घेतल्याचं दिसून येतंय. विखे समर्थकही जाहीरपणे काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना पाडण्याची भाषा करत आहेत.
शिर्डी येथे राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. विखे पाटील या बैठकीस आवर्जून उपस्थित होते. या बैठकीचं चित्रीकरण करण्यास प्रसार माध्यमांना रोखण्यात आलं. बैठकीनंतर बोलताना विखे पाटलांनी आपली भूमिका 27 एप्रिलला जाहीर करणार असल्याचं सांगितलं.
सुजय विखे संगमनेरमध्ये तळ ठोकून
राधाकृष्ण विखे पाटलांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटलांनी थोरातांच्या बालेकिल्ल्यात बैठकींचं आणि मेळाव्यांचं सत्र सुरू केलं आहे. संगमनेरमध्ये सुजय यांनी आज पाच छोट्या-मोठ्या सभा घेत थोरातांवर टीकेची झोड उठवली. युतीचं प्रामाणिकपणे काम करा, पाच वर्षात घड्याळ आणि पंजा हद्दपार करू, असं भाष्य सुजय यांनी संगमनेरातील सभेत केलं.
सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर नगर जिल्हयातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. दक्षिणेत विखे – पवार, तर शिर्डी लोकसभेत विखे – थोरात असा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. विखे थोरातांच्या लढाईत कोण बाजी मारतं हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.