“बाळासाहेब यांच्या विचारांची प्रतारणा करत हिंदुत्व राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलं”; भाजपच्या नेत्याने ठाकरे गटाला हिंदत्वावरून छेडलं
खरी शिवसेना ही शिंदे गटाकडे असून त्यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडून जरी निवडणूक आयोगावर टीका केली जात असली तरी आयोगाचा निर्णय योग्य आहे.
संगमनेर/अहमदनगर : गेल्या काही दिवासंपासून ठाकरे गट आणि भाजपची शाब्दिक चकमक वारंवार होत आहे. कधी ठाकरे गट तर कधी भाजप वेगवेगळ्या मुद्यावरून एकमेकाना छेडत असताना भाजपचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र ठाकरे गटाच्या हिंदुत्वाच्या मुद्यावरून छेडले आहे. ठाकरे गटाकडून सातत्याने भाजपवर संधीसाधू पक्ष अशी टीका केली जाते. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपमध्ये संधीसाधूपणा आहे हास्यास्पद विधान असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
मात्र भाजपच्या मदतीने तुम्ही निवडून आला आणि दुसऱ्या कळपात गेला ही संधीच तुम्ही साधली ना ? असा सवाल त्यांनी ठाकरे गटाला केला आहे. विखे पाटील यांच्या या विधानमुळे आता भाजप आणि ठाकरे गट चिघळण्याची शक्यता असल्याचे वर्तवले जात आहे.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ज्या 40 आमदारांनी बंडखोरी केली आणि राज्यात सत्तांतर घडवले. त्यांच्याविषयी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आजचं सरकारच हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर काम करते आहे.
ठाकरे गटाने मात्र सत्तेसाठी त्यांच्या विचाराला तिलांजली दिली असल्याचा घणाघात विखे पाटील यांनी ठाकरे गटावर केला आहे.
त्यामुळे संधीसाधू कोण आहे महाराष्ट्राला समजले आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे. त्यामुळे ठाकरे गटाने आता वायफळ बडबड बंद करावी हाच सल्ला त्यांना योग्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह या दोन्ही गोष्टी शिंदे गटाला दिल्या आहेत. त्या देत असताना बहुमताचा विचार करून ते चिन्ह आणि पक्ष शिंदे गटाकडे गेला आहे.
त्यामुळे खरी शिवसेना ही शिंदे गटाकडे असून त्यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडून जरी निवडणूक आयोगावर टीका केली जात असली तरी आयोगाचा निर्णय योग्य आहे.
आणि जर का निर्णय तुमच्या बाजूने लागला असता तर आयोग चांगला असं ठाकरे गटाने म्हटले असते असा खोचक टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
त्यामुळे ठाकरे गटाविरोधात निर्णय गेल्यामुळे त्यांनी लगेच शिमगा सुरु केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.मात्र निवडणूक आयोगावर टीका करताना लोकशाही प्रक्रियेत निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था असून तिचा सन्मान करायला शिकण्याची खरी गरज आहे असा सल्ला त्यांनी ठाकरे गटाला दिला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार देश कधीच विसरणार नाही, मात्र केवळ सतेच्या मोहापायी तुम्ही हिंदुत्व काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दावणीला बांधले असल्याची टीका विखे पाटील यांनी केली आहे. मात्र भाजपने कधीच बाळासाहेब ठाकरेंची प्रतारणा केली नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले.