शिवराज्याभिषेकाच्या दिवशी उधळलेला गुलाल आजही जिथल्या आसमंताला गुलाबी करतोय तो जिल्हा म्हणजे ‘रायगड’. या रायगड जिल्हयाचे पूर्वीचे नाव कुलाबा असे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला या जिल्ह्यात असल्याने 1981 साली 1 जानेवारीला या जिल्हयाचे नाव रायगड असे करण्यात आले. रायगड जिल्हयाला 240 कि.मी. लांबीचा विस्तिर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. रायगड जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 26,35,200 आहे. तर क्षेत्रफळ 7,152 वर्ग कि.मी. आहे. पूर्वेला सह्याद्री पर्वत रांगा आणि पुणे जिल्हा असून दक्षिणेला रत्नागिरी (आग्नेय दिशेला पाहिल्यास सातारा जिल्हा) उत्तरेला ठाणे जिल्हा आहे. या जिल्हयात प्राचीन ऐतिहासीक वास्तु, पर्यटकांना आकर्षीत करणारे समुद्रकिनारे, निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली उधळण, पश्चिम घाटात असलेली आकर्षक अप्रतिम ठिकाणे आपल्याला पहायला मिळतात. रायगड जिल्ह्यात पूर्वी काही ठिकाणी बेनेइस्त्रायली ज्यू लोकांचं वास्तव्य होतं. भात हे रायगड जिल्हयातील मुख्य पिक आहे लागवडीखाली असलेल्या एकंदर क्षेत्रापैकी बहुतांश म्हणजे 70 टक्के क्षेत्रात भात पिकाची लागवड होते. अष्टविनायकांपैकी दोन गणपतीची मंदिर (ठिकाणं) या जिल्हयात आहेत. 1) पाली येथील बल्लाळेश्वर 2) खोपोली जवळ महाड येथील वरदविनायक. जिल्ह्यातील महाडमध्येच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी सत्याग्रह केला होता. चवदार तळ्यावर हा सत्याग्रह झाला होता. रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये सध्या अनेक कलाकारांनी त्यांचे सेकंड होम तयार केलं आहे. रायगड जिल्हयात एकुण 14 तालुके आहेत त्यामध्ये पनवेल, अलिबाग, कर्जत, उरण, पेण, खालापुर, रोहा, सुधागड (पाली), पोलादपुर, महाड, म्हसळे, मुरूड, श्रीवर्धन, माणगाव या तालुक्यांचा समावेश आहे
पुढे वाचा