मुंबईवरून कोल्हापूरला जाणाऱ्या खासगी बसचा अपघात; चालकाचा जागीच मृत्यू तर…
Raigad Khopoli Private bus accident : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे, या खासगी बसच्या अपघाताने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताने मुंबई पुणे लेनवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वाचा सविस्तर...
रणजित जाधव, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, खोपोली, रायगड | 10 डिसेंबर 2023 : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. दररोज होणाऱ्या अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. रायगडच्या खोपोली हद्दीत भीषण अपघात झाला आहे. मुंबईवरून कोल्हापूरला जाणाऱ्या खासगी बसला अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात बसचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दहा प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे लेनवर झाला आहे. ही खासगी बस वैभव ट्रॅव्हल्स कंपनीची होती. अज्ञात वाहनाला मागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. खासगी बसच्या या अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत रेस्क्यू टीम वाहतूक पोलीस बोरघाट, खोपोली पोलीस स्टेशनचे कर्मचारी, डेल्टा फोर्सचे जवान, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान, लोकमान्य हॉस्पिटलच्या ॲम्बुलन्स, तसंच अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या टीमने घटनास्थळी जात मदत केली.
या अपघातात दहा प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. या जखमींना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केलं. तर या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बस चालकाला खोपोलीनगर पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
वाहतूक विस्कळीत
खोपोली हद्दीत मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघात झाला आहे. हा अपघात प्रचंड भीषण होता. अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांची मदत करण्यासाठी काही काळ गेला. त्यामुळे या अपघातामुळे मुंबई पुणे लेनवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. काही वेळाने ही वाहतूक पूर्ववत झाली.
मागच्या काही दिवसांपासून मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघातांची संख्या वाढते आहे. यात अनेकांचा बळी जातो आहे. अशात आता आज झालेल्या या खासगी बसच्या अपघाताने हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर दहा जण जखमी झालेत. या जखमींवर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.