रायगड : काँग्रेसच्या तडफदार महिला पदाधिकारी स्नेहल जगताप (Snehal Jagtap) आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. या वृत्ताला स्नेहल जगताप यांनीदेखील दुजोरा दिला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा संघर्ष पाहून आपम पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया स्नेहल जगताप यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली. स्नेहल जगताप यांचा राजकीय प्रवास बघायचा झाला तर त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत्या. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आता त्या ठाकरे गटात प्रवेश करत आहेत.
“आताची जी प्राप्त परिस्थिती आहे, याशिवाय संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे की, उद्धव ठाकरे यांनी राज्याचं मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. पण ज्या पद्धतीने त्यांना पायउतार व्हावं लागलं आहे. त्यांचा संघर्षमय प्रवास आहे. या प्रवासातून प्रेरित होऊन मी हा निर्णय घेतला आहे”, अशी प्रतिक्रिया स्नेहल जगताप यांनी दिली.
“माझ्या वडील माणिकराव जगताप यांचादेखील प्रवास हा संघर्षमय झालेला आहे. उद्धव ठाकरे आणि माझ्या वडिलांच्या प्रवासात मला साम्य वाटलं. त्यामुळे आपण उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभं राहावं असं वाटलं. उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करायला हवेत, असं वाटलं, म्हणून हा निर्णय घेतला आहे”, असं स्पष्टीकरण स्नेहल जगताप यांनी दिलं.
“महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे काम केलंच आहे ना. राहिला मुद्दा सांभाळून न घेण्याचं, तर मला वाटतं तसं काही होणार नाही. ज्यावेळेला विकासाच्या मुद्द्यावर आपण लढत असतो तेव्हा जनता एकत्रपणे येऊन पाठिशी ठामपणे उभी राहतेच”, अशी प्रतिक्रिया स्नेहल जगताप यांनी दिली.
उद्धव ठाकरे यांची आज महाडमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी महाडमध्ये सभा घेण्याआधी आज रत्नागिरीतील बारसू येथे जावून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी सविस्तर पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. त्यांनतर आता त्यांची महाडमध्ये सभा होत आहे. या सभेत स्नेहल जगताप यांचा पक्षप्रवेश होत आहे.