निवृत्ती बाबर, Tv9 मराठी, रायगड | 2 फेब्रुवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज रायगडच्या माणगाव येथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या आमदारांवर, भाजपवर आणि निवडणूक आयोगावरही सडकून टीका केली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाचं थेट नाव बदलून धोंडू ठेवू, असं म्हटलं. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला. “आमचा पक्ष दुसऱ्यांना देण्याचा त्यांना अधिकार नाही. निवडणूक आयोगाला देखील नाही. आम्ही निवडणूक आयोगाचं नाव बदलू. उद्यापासून निवडणूक आयोगाचं नाव धोंडू असं बोलू… ये धोंडू… तुझ्याकडे पुरावे नाहीत… तुझं नाव धोंडू”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. “जनतेत या… बाजूला हवं तर पोलीस ठेवू… जनतेच्या न्यायालयात जाऊन ठरवू शिवसेना कोणाची. लोकं ज्याला तुडवतील त्याची शिवसेना नाही, ज्याला डोक्यावर घेतील ती खरी शिवसेना. लसूणचे भाव काय आहेत…(जनतेतून 400) भाजपचा भाव नाही विचारला. आता यांच्या नाकाला कांदा लावावा लागेल. कारण बेशुद्ध होणार आहेत”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला.
“दोन दिवस मी रायगड जिल्ह्यात फिरतोय. गद्दार खासदार म्हणतात की उद्धव ठाकरे फिरतात गर्दी किती जमेल. या बघा… मला पहिल्या दसऱ्या मेळाव्याची आठवण आली. 1966 साली दसऱ्या मेळाव्याची घोषणा दिली. आम्हाला तेव्हा सांगण्यात आलं की शिवाजी पार्क किती मोठं मैदान आहे. एवढी गर्दी जमेल का? पण बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्येच मेळावा घेण्याचं ठरवलं. ओसंडून गर्दी वाहत होती. माझ्यात पण तेच रक्त आहे. जे काही आहे ते खुल्लम खुल्ला”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“मला मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न नाही. मी काही पागल नाही. पण काहीजण आहेत, मंत्रिपद मिळेल म्हणून जॅकेट शिवतात, नॅपकिन टाकून फिरतात. पंतप्रधान महाराष्ट्राच्या वाऱ्या करतात. ते म्हणालेत घराणेशाही नको. माझा कुटुंब संवाद होता. तिथे खासदार कोण… गद्दार…., त्याचे वडील कोण? मोठे गद्दार… ही घराणेशाही चालते”, अशी टीका ठाकरेंनी केली.
“इथे तटकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही ते स्पष्ट करावं. एका घरात खासदारकी, मुलीला आमदारकी…मुलाला आमदारकी…आता तिकीट मिळणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सांगावं. नाहीतर तटकरे यांनी राजकीय संन्यास घ्यावा. घरी तट सांभाळत बसा. खाजवून खरूज काढत आहेत आता. कधी काँग्रेसने शिवसेनेची माणसे घेतली. कधी शरद पवार यांनी शिवसेना फोडली. भुजबळांनी शिवसेना सोडली. पण गद्दारी केली नाही. शेजारचा मरतो कधी आणि त्याच्या घरचं कपाट घरी आणतो कधी ही भाजपची सवय”, अशी टीका ठाकरेंनी केली.
“भाजपने नेते कुठे दिलेत? नेहरू पंतप्रधान व्हायला नको हवे होते. सरदार वल्लभभाई पटेल यांना पंतप्रधान करायला हवं असं काहीजण त्यांच्यातले म्हणतात. सरदार वल्लभभाई यांनी संघावर बंदी घातली होती. तुम्हाला चालले असते का? भाजपचा या लोकसभेत नक्की पराभव होणार. चंदीगडमध्ये दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या केली. आपल्या इथे लबाडासारखं तिथे बसवलं. त्याने काँग्रेस आपची मते बाद केली”, असं ठाकरे म्हणाले.