पुणे – महाड (Mahad) मार्गावरील वरंध घाटातला (Varandha Ghat), प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (Department of Public Works) आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या हद्दीच्या वादामुळे दरडीसोबत खाली येऊन रस्त्यावर पडलेला भला मोठा दगड 5 दिवस एकाच जागी पडून होता. वारंवार पाठपुरावा करूनही हद्दीच कारण सांगून सार्वजनिक बांधकाम विभाग हात वर करत होतं. गावात ये-जा करण्यासाठी मोठी अडचण होतं असल्यानं शेवटी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन ब्रेकर लावून जेसीबीच्या साहाय्याने तो दगड बाजूला केला, मात्र या दरम्यान प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारावर ग्रामस्थांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पुण्याहून भोरमार्गे वरंध घाटातून महाडला जाणाऱ्या मार्गावर वारवंड गावाच्या फाट्यावर दरड कोसळून भला मोठा दगड रस्त्यावर मध्यभागी पडला होता. 5 दिवस होऊनही दगड न काढल्यानं गावकऱ्यांना गावात ये – जा करण्यास मोठी अडचण होतं होती.
वारवंड गावात जाणारा रस्त्यावर पडलेला दगड आणि महाडला जाणारा मुख्य रस्ता यामध्ये केवळ 4 ते 5 फुटांचं अंतर होतं. मात्र गावाकऱ्यांनी याबदल माहिती दिली असतानाही, सार्वजनिक बांधकाम विभागाने हद्दीच कारण सांगून हा दगड काढायला हात वर केले. शेवटी पडलेला दगड जेसीबीने हालात नसल्यानं, दगडाला ब्रेकर लावून ब्लास्ट करत जेसीबीच्या साहाय्याने ग्रामस्थांनीच हा दगड बाजूला केला.
गेल्या 5 दिवसांपासून हा दगड रस्त्याच्या मधोमध पडून असल्यानं, गावात चारचाकी गाडी जाऊ शकत नसल्यानं गावातील नागरिकांना 3 किलोमीटरची पायपीट करावी लागतं होती. कदाचित या ठिकाणी गावचा रस्ता नसता तर हद्दीचा प्रश्न आलाच नसता. मात्र हा दगड वारवंड गावाच्या रस्त्यावर पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हद्दीच कारण सांगून हात वर केले होते. तर जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे या साठीची सक्षम यंत्रणा नसल्यानं हा दगड निघणार कधी असा प्रश्न ग्रामस्थांना पडला होता.
दगडामुळं चारचाकी गाडी गावात जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती, कुणी आजारी पडलं तर उचलून भर पावसात तीन किलोमीटरची पायपीट करून रुग्णाला आणावं लागत होतं.फक्त जेसीबीच्या साह्यानं दगड बाजूला करणं शक्य नसल्यानं,शेवटी वारवंडच्या गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन दगडाला ब्रेकरंच्या साह्यानं ब्लास्ट करून दगड बाजूला केला. मात्र प्रशासनाच्या कारभारावर वारवंड गावाचे सरपंच लक्ष्मण दिघे यांच्यासह गावातील नागरिकांनी तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे.