Jogeshwari Terminus | आता जोगेश्वरीला गावी जायची ट्रेन पकडा, रेल्वे बोर्डाकडून टर्मिनसच्या कामाला मंजुरी
गर्दीच्या वेळी लोकल प्रवास वेगवान होण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबई सेंट्रल किंवा वांद्र्यापर्यंत न नेता उपनगरातच त्यांचा प्रवास थांबण्याचा रेल्वे मंत्रालयाचा प्लॅन आहे.
मुंबई : मेल-एक्स्प्रेसच्या ट्रॅफिकमुळे मुंबई उपनगरीय लोकल सेवेला (Western Railway Local) अनेकदा फटका बसल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच रेल्वेने उपनगरात टर्मिनस (Railway Terminus) बांधण्यास परवानगी दिली आहे. दोन वर्षांपूर्वी रेल्वे बजेटमध्ये जोगेश्वरी टर्मिनसचा समावेश करण्यात आला होता. पश्चिम रेल्वेचे दोन प्लॅटफॉर्म बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जोगेश्वरी टर्मिनसच्या (Jogeshwari Terminus) वर्क ऑर्डरला रेल्वे बोर्डाने कालच मंजुरी दिली. त्यामुळे येत्या दोन-अडीच वर्षांत जोगेश्वरी टर्मिनसवरुन तुम्हाला गावी जाता येऊ शकेल.
काय आहे योजना?
गर्दीच्या वेळी लोकल प्रवास वेगवान होण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबई सेंट्रल किंवा वांद्र्यापर्यंत न नेता उपनगरातच त्यांचा प्रवास थांबण्याचा रेल्वे मंत्रालयाचा प्लॅन आहे. त्यासोबतच काही नवीन गाड्या सोडण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. मात्र कोणत्या गाड्या ट्रान्सफर करायच्या आणि कोणत्या नवीन सोडायच्या, याचा निर्णय नंतरच घेण्यात येणार आहे.
रेल्वे बजेटमध्ये 69 कोटी
पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल आणि बांद्रा टर्मिनस स्थानकांवरील भार कमी करण्यासाठी जोगेश्वरीला लांब पल्ल्याच्या ट्रेनचे नवे टर्मिनस उभारले जाणार आहे. या प्रकल्पासाठी दोन वर्षांपूर्वी रेल्वे बजेटमध्ये 69 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
वर्क ऑर्डरला मंजुरी
जोगेश्वरी टर्मिनसच्या 69 कोटींच्या वर्क ऑर्डरला रेल्वे बोर्डाचे संचालक (प्रकल्प निरीक्षण) पंकज कुमार यांनी मंजुरी दिली. अडीच कोटी खर्च करुन जोगेश्वरीत दोन प्लॅटफॉर्म बांधण्यात आले आहेत. आता 69 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीला मंजुरी मिळाल्याने रेल्वे रुळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा यासारखी तांत्रिक कामंही केली जाणार आहेत