High Speed Train: लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि लाखो बीडकरांचं स्वप्न साकार, अहमदनगर ते आष्टीदरम्यान धावली ट्रेन!
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नातील बीडमधील रेल्वेचे स्वप्न काल साकार झाले. यानिमित्त हजारो बीडवासियांनी आनंदोत्सव साजरा केला.
बीडकरांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न सत्यात उतरले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून बीडकर परळी-बीड, अहमदनगर रेल्वेसाठी प्रयत्न करत आहेत. स्व. गोपीनाथ मुंडे यांनीही यासाठी अनेक वर्षे पाठपुरावा केला होता. मागील काही वर्षांपासून या प्रकल्पावर वेगाने काम झाले. अखेर काल 29 डिसेंबर रोजी अहमदनगर- बीड-परळी रेल्वे (Beed Train) मार्गावरील अहमदनगर ते आष्टी या 61 किलोमीटर अंतरावर बारा डब्यांची हायस्पीड रेल्वे धावली आणि बीडकरांचे कित्येक वर्षांचे स्वप्न साकार झाले. या रेल्वेचा वेग ताशी 144 किलोमीटर एवढा होता.
खासदार प्रीतम मुंडेंच्या उपस्थितीत रेल्वेचे स्वागत
29 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता आष्टी रेल्वे स्थानकावर जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते पूजन करून या रेल्वेचे स्वागत झाले. त्यानंतर हिरवी झेंडी दाखवल्यानंतर आष्टी ते अहमदनगर हायस्पीड रेल्वे परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाली.
बीडकरांसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प
बीड जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प असून अनेक वर्षांपासून हे काम रखडलेले होते. नगर-बीड-परळी या 261 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाला सुरुवातीला 1995 मध्ये मंजुरी मिळाली. त्यावेळी केवळ 353 कोटी रुपये खर्च या प्रकल्पासाठी अपेक्षित होता. मात्र तत्कालीन रेल्वे मंत्रालयाने निधी देण्यास टाळाटाळ केल्याने हा प्रकल्प रखडला होता. 2014 मध्ये पंतप्रधान मोदी यांचे सरकार आल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी 27 वर्षांपासून रखलेल्या रेल्वे प्रकल्पाला वेग आला.
ही ट्रेन धावल्यानंतर हजारो बीडकरांनी गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा उंचावत, रेल्वेला सलामी दिली. बीडमधील आष्टी रेल्वे स्थानकावरील हा प्रसंग आनंदाने भारलेला होता.
मुंडे भगिनींनी केले स्वागत
गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न असलेल्या या रेल्वे मार्गावर पहिली रेल्वे धावल्यामुळे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे दोघींनीही या घटनेचे स्वागत केले. भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक घटकाचे मी अभिनंदन करते. खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नावार आणखी एक रेकॉर्ड नोंद होतोय. अभिनंदन. तसेच मोदीजी, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांचे आभार पंकजा मुंडे यांनी मानले. खासदार प्रीतम मुंडे यावेळी आयोजित स्वागत कार्यक्रमात म्हणाल्या, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेकांनी बीड रेल्वेसाठी संघर्ष केला. आंदोलने आणि मोर्चे काढले. आज आष्टीपर्यंत हायस्पीड रेल्वे धावली. मी इथे श्रेय घेण्यासाठी आले नाही तर स्वप्नपूर्तीच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल पाहण्यासाठी आले आहे, असे खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या.
इतर बातम्या-