राज्यात सध्या सर्वत्र ऑक्टोबर हिटचा तडाखा बसत आहे. तापमान चांगलेच वाढल्यामुळे नागरिक घामाघूम होत आहे. त्याचवेळी आता राज्यात पावसाचेही कमबॅक होत आहे. राज्यात पुढील चार दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्रात सुद्धा होणार आहे. आता ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गडगडाटीसह पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
राज्यातील अनेक शहरांचे तापमान सध्या ३७ ते ३७ अंशावर गेले आहे. त्याचवेळी परतीचा पाऊस महाराष्ट्रच्या उंबरठ्यावर आहे. हा पाऊस नंदुरबारपर्यंत आला. आता येत्या २-३ दिवसांत तो महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात वाटचाल करणार आहे. त्यामुळे ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान पडणारा पाऊस परतीचा पाऊस असणार आहे.
राज्यात ९ व १० विदर्भातील ११ जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तसेच १० व ११ ऑक्टोबरला खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, कोकण व मराठवाडा या भागांत तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटीसह किरकोळ पावसाचीच शक्यता आहे.
मुंबई उपनगरातील अंधेरी, वांद्रे, गोरेगाव, मालाड, बोरीवली परिसरात रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. कल्याण-डोंबिवलीतही सकाळपासून ढगाळ वातावरणात होते. दुपारी तीननंतर अचानक रिमझिम पावसाला सुरवात झाली. गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोंबर महिन्यात जाणवणाऱ्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. आता आलेल्या पावसामुळे त्यांना दिलासा मिळाला.
विदर्भातील काही भागांत पाऊस सुरु झाला आहे. अकोल्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली. जवळपास 20 ते 25 मिनिट मोठा पाऊस झाला. आज दुपारी साडेतीन नंतर अकोल्यातील मोठी उमरी, शिवनी परिसर तसेच शहरातील विविध भागात पावसाने हजेरी लावली. दुपारी दोनपर्यंत तापलेल्या उन्हानंतर काही वेळातच आकाशात ढगाळ वातावरण झाले आणि पाऊस सुरु झाला.