Rain Update : विदर्भात रिमझिम तर सोलापूर, लातुरात मुसळधार अवकाळी पाऊस, उकाड्यापासून दिलासा मात्र शेतकरी धास्तावले
नागपुरात दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि वारे वाहायला सुरवात झाली होती, नागपुरात तापमान 44 अंश सेल्सियास पर्यंत पोहचले असल्याने, उष्णतेने त्रस्त असलेल्या नागपूरकरांना या पावसाने काही आनंदाचे क्षण अनुभवता आले आहे. मात्र पावसानंतर उकाडा आणखी वाढण्याचीही शक्यता आहे.
नागपूर – वाढलेल्या उष्णतेने हैराण (Heat Wave) झालेल्या विदर्भात आज दुपारपासून जरा ढगाळ वातावरण होते. संध्याकाळच्या सुमारास विदर्भातील काही जिल्ह्यांत रिमझिम पाऊस (Rain) झाला आहे. नागपूरच्या काही भागात हलक्या स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झालीय. नागपुरात दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि वारे वाहायला सुरवात झाली होती, नागपुरात तापमान 44 अंश सेल्सियास पर्यंत पोहचले असल्याने, उष्णतेने त्रस्त असलेल्या नागपूरकरांना या पावसाने काही आनंदाचे क्षण अनुभवता आले आहे. मात्र पावसानंतर उकाडा आणखी वाढण्याचीही शक्यता आहे. असानी चक्रीवादळाचा काहीसा परिणाम विदर्भावर (Vidarbha Rain) होऊन पाऊस येण्याची शक्यता नागपूर हवामान विभागाने वर्तविली होती ती खरी ठरली आहे. सायंकाळच्या वेळी हलक्या स्वरूपाचा हा पाऊस असला तरी रात्रीपर्यंत यात वाढ होईल का याकडे लक्ष लागलं आहे.
ग़डचिरोलीतही अवकाळी पाऊस
गडचिरोली जिल्ह्यातही रिमझिम अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात संध्याकाळपासूनच वादळी वातावरण तयार झाले होते. आता रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा अहेरी गुड्डीगुड्डम उमानुर या भागात पावसाला सुरुवात झाली आहे.
सोलापुरात अक्कलकोट तालुक्यात मुसळधार
सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. अक्कलकोट-गाणगापूर महामार्गावर पावसाने जोरदार हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेले नागरिक सुखावले आहेत. मात्र काही भागातील बागायतदार शेतकरी धास्तावलेले आहेत. सोलापुरात इतरही तालुक्यांत पावसाने हजेरी लावली आहे.
मराठवाड्यातही हजेरी
मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला आहे. वादळी पावसाने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. तर अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
नांदेडलाही पावसाचा तडाखा
असामी चक्रीवादळाचा परिणाम आज नांदेडमध्ये दिसून आलाय, जिल्ह्यातील काही भागात सांयकाळच्या सुमारास जोरदारपणे अवकाळी पाऊस बरसलाय. नायगांव तालुक्यातील बरबडा शिवारात या पावसाची तीव्रता अधिकची होती. या पावसाने उष्णतेच्या लाटेत भाजलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. दरम्यान, असामी चक्री वादळामुळे नांदेडमध्ये ढगाळ वातावरण बनलं असून काही भागात वादळी वारे देखील वाहत आहे.