मुंबईचे कमाल तापमान 32 डिग्री सेल्सिअसवर आहे. त्यातच पुढील दोन दिवस हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह ठाण्यात पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये हा ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळणार आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार 17 ऑक्टोबरला पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. कोकणामध्ये भात कापणीला आलेला असताना पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिला आहे. पाच जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
जालना, परभणी, हिंगोलीत देखील काही प्रमाणात पाऊस होत आहे. पण रविवारपर्यंत तो वाढण्याची शक्यता आहे. 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी हवामान विभागाने हा पावसाचा इशारा दिला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाला. आता परतीचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.