“लाडक्या बहिणीला न्याय मिळेल हे पाहणं पहिलं कर्तव्य नाही का?” राज ठाकरेंचा सणसणीत सवाल
या ट्वीटमध्ये त्यांनी बदलापूर घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच याप्रकरणावरुन त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. त्यासोबतच राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचेही कौतुक केले आहे.
Badlapur School Rape Case Update : “जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का ?” असा थेट सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला. या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास 12 तास उशीर केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेचे तीव्र पडसाद बदलापुरात उमटले आणि मोठे आंदोलन करण्यात आले. आता यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी बदलापूर घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच याप्रकरणावरुन त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. त्यासोबतच राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचेही कौतुक केले आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
“बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं, यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं. मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही.
आज सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का ? जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे,ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे”, असे राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं.
बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं, यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं.
मुळात हा महाराष्ट्राच्या…
— Raj Thackeray (@RajThackeray) August 21, 2024
नेमकं प्रकरण काय?
बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला. या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास 12 तास उशीर केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेचे तीव्र पडसाद बदलापुरात उमटताना दिसत आहेत. याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेतील एसआयटी गठीत करण्यात आली आहे. तसेच, कर्तव्यात कसूर करणार्या तीन पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेत जलदगती न्यायालयात खटला चालवण्यात येणार आहे.