‘ राज्यात मनसेच्या मदतीने युती सरकार येईल’; राज ठाकरेंचं मोठं भाकीत, नेमकं काय म्हणाले?
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत 'टीव्ही 9 मराठी'वर प्रसारीत झाली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी अनेक खुलासे केले आहेत.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत ‘टीव्ही 9 मराठी’वर प्रसारीत झाली. मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी घेतलेल्या या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी अनेक खुलासे केले आहेत. मनसेच्या मदतीने युती सरकार येईल असं भाकीत राज ठाकरे यांनी यावेळी केलं आहे. भाजप आणि आघाडीचं सरकार यात माझा संबंध किंवा कन्फर्ट झोन पहिल्यापासून भाजपसोबत आहे. तो कधी लपवला नाही, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
मनसेच्या मदतीने युती सरकार येईल, असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, भाजप आणि आघाडीचं सरकार यात माझा संबंध किंवा कन्फर्ट झोन पहिल्यापासून भाजपसोबत आहे. तो कधी लपवला नाही. मी शिवसेनेत असताना दुसरा पक्ष समोर आला तो भाजप होता. वाजपेयी, अडवाणी, महाजन, गोपीनाथ मुंडे यांचा सहवास मिळाला. १९८४ पासून महाजन घरी यायचे. आमचे संबंध वाढले. त्यामुळे कन्फर्ट झोन वाढला. नंतर फडणवीस आले, तावडे आले. त्यामुळे भाजपसोबत कन्फर्ट झोन आहे. उद्या युतीला गरज लागू शकते. माझे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा माझा प्रयत्न आहे. २३ तारखेनंतर काय होईल हा नंतरचा विषय आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचा वारसा चालवतात असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं, यावर देखील राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे बाळासाहेबांचा वारसा चालवतात हे फडणवीस यांचं मत आहे. त्यांचं मत त्यांच्यापाशी. कोणी काय मत मांडायचं हे त्यांनी ठरवायचं. मी कसं ठरवणार. वारसा हा वास्तूचा नसेल तर व्यक्तीचा आहे. एखाद्या व्यक्तीला त्यांच्यात वारसा दिसत असेल तर दिसू द्या. कोण काय बोलतं याची उत्तरं मी काय द्यायची. याला काही अर्थ नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.